वटपौर्णिमा कधी आहे
वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र, तसे करू नये, असा सल्ला दिला जातो.
उत्तर भारतात पौर्णिमान्त महिन्यातला कृष्णपक्ष आधी येतो आणि मग शुक्लपक्ष. दोन्ही पद्धतीत शुक्ल पक्ष एकाच काळात असतात. म्हणून उत्तर भारतात ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी १९ मे रोजी वट सावित्री व्रत साजरे केली जात आहे आणि देशाच्या काही भागांमध्ये म्हणजेच गुजरात आणि महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा हे व्रत पाळले जाईल. यावेळी ३ जून २०२३ रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे.
पौर्णिमा तिथी प्रारंभ : ३ जून २०२३ सकाळी ११.१७
पौर्णिमा तिथी समाप्ती : ४ जून २०२३ सकाळी ९.११
वटपौर्णिमा महत्व
आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी बायका वटपौर्णिमा हे व्रत करतात. यामुळे वैवाहीक जीवनातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार त्यादिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले. अशी आख्यायिका आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. वट सावित्री व्रताच्या दिवशी वडाचे झाड म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते. कारण, या झाडाच्या पारंब्यांजवळ सावित्रीच्या मृत पतीचा मृतदेह सुरक्षित ठेवला होता. तसेच, वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे.