घर विकणारा आणि घर हवे असणारा या दोहोंमधील दुवा म्हणून रिअल इस्टेट एजंट अर्थात मध्यस्थ काम करत असतो. दोन्ही बाजूच्या घटकांचे समाधान करत स्वत:चा निर्वाह करण्याची भूमिका पार पाडणाऱ्या या मध्यस्थाला आता सक्षमता प्रमाणपत्र अर्थात कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट प्राप्त करावे लागणार आहे.
शनिवार, २० मे रोजी रिअल इस्टेट एजंटसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. अशाप्रकारचा प्रयोग महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणातर्फे (महारेरा) प्रथमच करण्यात येणार आहे. रिअल इस्टेट एजंट हा घर, प्लॉट वा फ्लॅट अशा प्रकारच्या खरेदी-विक्री व्यवहारातील महत्त्वाचा घटक आहे. या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट एजंटच्या कार्यपद्धतीमध्ये सुसंगतता यावी, खरेदी-विक्रीचे व्यवहारासंबंधी संपूर्ण कायदेशीर माहिती असायला हवी या सर्व बाबींचा विचार करून महारेराने एजंटसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा असे स्वरूप निर्धारित केले आहे.
जे रिअल इस्टेट एजंट महारेराकडे पूर्वीपासून नोंदणीकृत आहेत, त्यांना पुनर्नोंदणीसाठी १ सप्टेंबर २०२३ पर्यंत महारेराकडून सक्षमता प्रमाणपत्र मिळवायचे असून ते एजंटला स्वत:च्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.
-महारेराने १ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना काढत रिअल इस्टेट एजंटला परीक्षा देणे अनिवार्य केले आहे.
-आजघडीला राज्यात ३८ हजार ७७१ रिअल इस्टेट एजंट महारेराकडे नोंदणीकृत आहेत.
-परीक्षेच्या पहिल्याच प्रयोगात त्यातील ४५७ एजंट सहभागी होतील.
-नागपूरसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे परीक्षा होणार आहे.
-यासाठी महारेराने रिअल इस्टेट एजंट, बँकिंग संस्था, घर खरेदीदार, प्रवर्तक आणि ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नन्स यांच्याशी चर्चा करून अभ्यासक्रम तयार केला आहे.
-एजंटच्या सुविधेनुसार हा अभ्यासक्रम ऑनलाइन, प्रत्यक्ष किंवा हायब्रिड (ऑनलाइन व प्रत्यक्ष दोन्ही) स्वरूपात उपलब्ध आहे.
-या अभ्यासक्रमाची पहिली बॅच २० मे रोजी परीक्षा देणार आहेत. जे एजंट ही परीक्षा उत्तीर्ण करतील त्यांना सक्षमता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
-केवळ प्रमाणपत्रप्राप्त व्यक्तीच रिअल इस्टेट एजंट म्हणून महारेराकडे नोंदणी करू शकणार आहे.