मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील बेकायदा शाळांचा आकडा शून्यावर आला आहे. गेल्या वर्षी शहरात काही बेकायदा शाळा आढळून आल्या होत्या. त्यांची सद्यास्थिती जाणून घेण्यासाठी पालिकेमार्फत नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. यात एकही शाळा बेकायदा नसल्याचे समोर आले आहेत. तसा अहवाल शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला आहे.
मिरा-भाईंदरमध्ये २०० हून अधिक खासगी शाळा आहेत. या शाळांकडे शिक्षण विभागाची आवश्यक परवानगी असणे आवश्यक आहे. मात्र, कोणतीही परवानगी न घेता, शहराच्या विविध भागांत सात शाळा मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याची बाब गेल्या वर्षी पालिकेच्या समग्र शिक्षा अभियानातील माहितीद्वारे निदर्शनास आली होती. प्रारंभी या शाळांना शाळा बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर या शाळांकडून प्रत्येकी एक लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता.
सरकारकडून बेकायदा शाळांवर कारवाई करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी बेकायदा आढळून आलेल्या शाळांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. यात मधल्या काळात चार बेकायदा शाळा बंद करण्यात आल्या, तर दोन शाळांच्या संस्थांनी यंदा शाळा बंद करत असल्याचे कळवले. उर्वरित एका शाळेने केंद्र सरकारची परवानगी असल्याची कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे शहरात सध्या एकही बेकायदा शाळा नाही. तसा अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.