‘जास्तीत जास्त रोजगारनिर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरे नक्कीच मोलाची भूमिका बजावतील’, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला. तसेच, लवकरच महापालिकेच्या १०० शाळांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील घोषणा केली. ‘युवापिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करत आहे. यामुळेच संपूर्ण जगात भारताचे नाव अभिमानाने घेतले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था ११वरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पाऊले ओळखून नावीन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या कारकिर्दीत मार्गदर्शन करण्याचा, तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार जे. पी. नड्डा, खासदार मनोज कोटक, आमदार ॲड. आशीष शेलार आदी याप्रसंगी उपस्थित होते.
बदल लक्षात घेऊन शिक्षण घ्यावे : नड्डा
‘औद्योगिक क्षेत्रामध्ये आज झपाट्याने बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. पुरवठादारास औद्योगिक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण बदल व मागणी कळत नाही. त्यामुळे मागणी करणाऱ्याला काय हवे ते जाणून घ्या. तांत्रिक शिक्षण गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात अद्ययावत होत राहावे लागेल. १० लाख रोजगार देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. त्यानुसार दोन लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. १३ लाखांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले जात आहे. देशातील कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून मोदींनी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यावेळी नमूद केले.