शहरातील तीन अनधिकृत शाळांना महापालिकेच्या शिक्षण विभागाने एकूण ९ कोटी ७८ लाख २० हजार दंड भरण्याची नोटीस दिली आहे. संबंधित केंद्र प्रमुखांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला असून, या शाळेतील विद्यार्थ्यांचे ४८ तासांच्या आत जवळच्या शाळेत समायोजन करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या आदेशांनुसार अनधिकृत शाळांच्या विरोधातील मोहीम महापालिका शिक्षण विभागामार्फत कडक करण्यात आली असून, एमराल्ड हाइट पब्लिक स्कूल (जेलरोड) या शाळेला ५ कोटी ४५ लाख ८० हजार रुपये, वंशराजे हिंदी मीडियम स्कूल (सातपूर) व खैरूल बनात इंग्लिश मीडियम स्कूल (वडाळा) यांना प्रत्येकी २ कोटी १६ लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात या शाळांना नोटीस काढून त्या तत्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतरही संबंधित शाळा सुरू असल्यामुळे महापालिका शिक्षण विभागाने बुधवारी या शाळांना दंडात्मक कारवाईची नोटीस दिली. याशिवाय अनधिकृत शाळा सुरू केल्याबाबत एक लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांसह कार्यकारी मंडळ व सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश केंद्रप्रमुखांना देण्यात आला आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांचे जवळच्या शाळेत ४८ तासांच्या आत समायोजन केले जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या शाळा कोणत्याही मान्यतेविना शहरात सुरू असून, त्या बंद करण्याबाबत शिक्षण विभागामार्फत सातत्याने सूचना देण्यात येत होत्या. तसेच या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याबाबत पालकांनाही सांगितले जात होते. सातत्याने सूचना देऊनही शाळा अनधिकृतरित्या सुरूच ठेवल्याने अखेर शिक्षण विभागाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमानुसार प्रतिदिवस १० हजार रुपयांप्रमाणे हा दंड आकारण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितले.
…तर मालमत्तेवर शास्तीचा बोजा
संबंधित शाळांना दंडाची रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन केल्याचा व दंड भरल्याचा अहवाल पुराव्यांसह सादर करण्याची सूचना केंद्रप्रमुखांना देण्यात आली आहे. दंड न भरल्यास संस्थेच्या मालमत्तेवर शास्तीचा बोजा चढविण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.