मे महिन्याची सुट्टी कागदोपत्रीच! माहिती भरण्यात जातोय शिक्षकांचा दिवस

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

ऐन सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची विविध प्रकारची माहिती भरून द्यावी लागत असल्याने सध्या शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मे महिन्याची सुट्टी केवळ कागदोपत्रीच असून, प्रत्येक दिवस माहिती भरून देण्यातच वाया जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण खात्याच्या कारभारावर या शिक्षकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

दरवर्षी मे महिन्यात विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतात. यासोबतच शिक्षकांनाही सुट्ट्या लागतात. वर्षातून एकदाच मोठी सुट्टी घेण्याची संधी मिळत असल्याने अनेक शिक्षक बाहेरगावी फिरण्याचे बेत आखतात. तसेच, अनेकजण कुटुंबासह गावी जातात. मात्र यंदा ऐन सुट्टीत त्यांना विविध प्रकारची कामे दिली जात आहेत. यामुळे सुट्टीचे ठरवलेले नियोजन विस्कळीत होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

‘यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत शिक्षकांना ‘सरल’ प्रणालीवर विद्यार्थ्यांच्या आधारची जोडणी करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व्हरमधील अडचणी, पालक गावी गेल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करताना त्यांना याकामी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाचा भार वाहताना नाकी नऊ आले असताना आता पालिकेच्या शिक्षण विभागाने १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. त्यामध्ये परराज्यांतून अथवा दुसऱ्या जिल्ह्यांतून मुंबईत आलेले विद्यार्थी, तसेच मुंबईतून अन्य जिल्ह्यांत किंवा परराज्यांत स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती द्यायवयाची आहे. मात्र अनेक शिक्षक सुट्टीमुळे गावी गेले आहेत. तर, विद्यार्थ्यांची माहिती नोंदवलेली वही शाळेत जमा करण्यात आली आहे. ही माहिती मिळविण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना आता शाळेत यावे लागणार आहे. शिक्षण विभागाने आधीच माहिती गोळा केली असती तर शिक्षकांची हक्काची सुट्टी वाया गेली नसती, असे एका मुख्याध्यापकाने नमूद केले. ‘शिक्षकांनी वर्षभरात कोणकोणते नवीन उपक्रम राबविले’, यांची माहितीही सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये उपक्रमाचे उद्दिष्ट, थोडक्यात तपशील, कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांना झालेला लाभ आदींची माहिती शिक्षण विभागाला द्यायची आहे’, असेही या मुख्याध्यापकाने सांगितले.

‘सुट्टीपूर्वीच माहिती घेणे अपेक्षित’

‘शिक्षकांना त्यांची वर्षभरात प्रलंबित राहिलेली कामे करण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी हक्काची असते. मात्र यंदाची संपूर्ण सुट्टी आधीच आधारजोडणीत गेली आहे. आता अन्य माहितीही भरून मागितली जात आहे. शिक्षण विभागाने शाळांना सुट्ट्या लागण्यापूर्वीच ही माहिती घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न केल्याने शिक्षकांना हक्काच्या सुट्टीवेळी ही कामे करावी लागत आहेत’, अशी नाराजी एका शिक्षकाने व्यक्त केली.

‘३० एप्रिलपूर्वी व्हायला हवी होती आधारजोडणी’

याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, ‘उपक्रमांची माहिती भरण्याचे बंधन शिक्षकांना नाही. ती माहिती ऐच्छिक स्वरूपाची आहे. तसेच आधारजोडणीचे काम गेल्या वर्षभरात ३० एप्रिलपूर्वी करणे अपेक्षित होते. मात्र शिक्षकांनी ते पूर्ण न केल्याने आता सुट्ट्यांमध्ये काम करावे लागत आहे’, असे सांगण्यात आले.

Source link

Career Newseducation newsMaharashtra TimesMay vacationschool holidayTeachers Vacationमे महिन्याची सुट्टी
Comments (0)
Add Comment