Academic Audit: ४० महाविद्यालयांची अ‍ॅकॅडमिक ऑडिटची ‘परीक्षा’

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडून ४० महाविद्यालयांचे ‘अ‍ॅकॅडमिक ऑडिट’ अंतिम टप्प्यात आहे. त्याचा अहवाल आठवडाभरात जाहीर केला जाणार आहे. नुकतीच ३३ बीएड, बीपीएड, विधी महाविद्यालयांवर अपात्रतेची कारवाईनंतर या मूल्यांकनात किती महाविद्यालयांवर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांचा शैक्षणिक व प्रशासकीय दर्जा वाढविण्यासाठी ‘अॅकॅडमिक ऑडिट’ करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. २२९ महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले होते. या टप्प्यांत ११० पेक्षा अधिक महाविद्यालयांचे काम सुरू आहे. त्यासाठी चार विविध समिती पडताळणीचे काम करीत असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यात ४० महाविद्यालयांच्या मूल्यांकनाचे काम अंतिम झाले असल्याचे सांगण्यात येते. अंतिम अहवालानंतर विद्यापीठ महाविद्यालयांची श्रेणी जाहीर करणार आहे. तपासणीत ‘नो ग्रेड’ महाविद्यालयांवर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

अॅकॅडमिक ऑडिटमध्ये महाविद्यालयाची इमारत, ग्रंथालय, प्रयोगशाळा, मैदान, भौतिक सुविधांसह पात्र शिक्षक, वर्ग खोल्या आदींची छाननी करण्यात येते. तीनशे गुणांवर आधारीत हे मूल्यमापन होते. त्यानुसार ए, बी, सी व डी अशा चार श्रेणीत महाविद्यालयांची वर्गवारी करण्यात येते.

४५ महाविद्यालये ‘नो ग्रेड’

पहिल्या टप्प्यात मे-२०२२मध्ये २२९ महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकन झाले. त्यावेळी तपासणीत महाविद्यालयांमधील सोयीसुविधांचे पितळ पुन्हा उघडे पडले होते. त्यात केवळ ३९ महाविद्यालये ‘अ’ श्रेणीत होती. ‘ब’ श्रेणीत ३५, ‘क’ श्रेणीत ३४ तर ‘ड’ श्रेणीत ६८ महाविद्यालये आहेत. कोणतीही श्रेणी देण्याची स्थिती नसलेली महाविद्यालयांची संख्या ४५ आहे. आता या तपासणीत काय होते, किती महाविद्यालये ‘ड’ श्रेणीत, ‘नो ग्रेड’मध्ये असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शैक्षणिक मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. चाळीस महाविद्यालयांची तपासणी पूर्ण झाली असून, आठवड्यात त्यांची श्रेणी जाहीर करण्यात येईल. गुणवत्तेबाबत विद्यापीठ तडजोड करणार नाही. सोयीसुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल.
– डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Source link

Academic AuditCarer Newscollegeseducation newsMarathwada Universityuniversity Examअ‍ॅकॅडमिक ऑडिटमहाविद्यालय
Comments (0)
Add Comment