अदा शर्मा स्टारर सिनेमा ‘द केरला स्टोरी’ च्या कमाईत घसरण आसल्याचं चित्रप होतं, पण तिसऱ्या शनिवारी पुन्हा चित्रपटानं भरारी घेतल्याचं पाहायला मिळालं. तिसऱ्या शनिवारी ३० टक्के जास्त फायदा झाल्याचंही दिसून आलं. तिसऱ्या शनिवारी म्हणजेच १६ व्या दिवशी चित्रपटानं तब्बल ९ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं चित्रपटाचा आतापर्यंतचा गल्ला हा १८७.३२ कोटींचा झाला आहे.
चित्रपटावरची बंदी उठवली
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर राज्यात बंदी घालण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी स्थगित केला. कल्पितावर आधारित अशी टीप टाकण्याचे निर्देश यावेळी निर्मात्यांना देण्यात आले. हा चित्रपट पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याचे आदेशही न्यायालयाने तमिळनाडू सरकारला दिले.
‘एफटीआयआय’मध्ये गोंधळ
मिती फिल्म सोसायटीतर्फे ‘एफटीआयआय’मध्ये ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा विशेष खेळ शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला होता. डाव्या विचारांचा प्रभाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या संस्थेत हा चित्रपट दाखवला जाणार असल्यानं सकाळी नऊपासून कलाकार, प्रेक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आयोजकांनी माध्यम प्रतिनिधींना बोलविल्यानंतरही त्यांना प्रवेशास अटकाव करण्यात आला. ‘
एफटीआयआय’चे चित्रपटगृह राजकीय व धार्मिक अजेंड्यासाठी वापरण्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांनी ‘प्रपोगंडा चित्रपट’ म्हणून विरोध केला. चित्रपटाविरोधात त्यांनी फलक दाखविले. चित्रपटाचे प्रक्षेपण सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांकडून ते बंद करण्याबाबत घोषणाबाजी करण्यात येत होती. त्याला उत्तर म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही घोषणा दिल्या. सुमारे पाच तास हा वाद सुरू होता. या वेळी मोठ्या संख्येने पोलिस दाखल झाल्याने ‘एफटीआयआय’ला छावणीचे स्वरूप आले होते.