NEP: यंदापासून पदवी चार वर्षांची, जाणून घ्या तपशील

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पावले टाकली आहेत. विद्यापीठ स्तरावर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमाची रूपरेषा अंतिम करण्याचे काम सुरू आहे. विद्यापीठाने चौथे वर्ष दोन स्तरावर निश्चित केले; यात ‘सर्वसाधारण’ व दुसरे ‘संशोधन’वर आधारित असणार आहे. दोनपैकी एक स्तर निवडण्याची संधी विद्यार्थ्याला असेल. या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया असेल. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयात राबवायचा, की नाही हे महाविद्यालयाला स्वातंत्र्य असणार आहे. नवीन बदलाची अंतिम रचना आठवडाभरात जाहीर होणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर अभ्यासक्रम कसा असेल, पुढील प्रक्रिया कशी असेल याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या दृष्टिकोनातून तयारी केली आहे. अभ्यास मंडळाच्या बैठका घेत अभ्यासक्रमाची रचना निश्चित केली जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन बदल अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यात येत आहे.

बदल करताना महाविद्यालय पातळीवर पायाभूत सुविधांचा विचार केला जात असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये चार व तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असणार आहे. तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासह चार वर्षांचा अभ्यासक्रम महाविद्यालयांना राबवावा लागणार आहे. विद्यापीठाने त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरुवात करणार आहे.

उपलब्ध अभ्यासक्रम, महाविद्यालयांची जबाबदारी, प्रवेश प्रक्रिया याबाबतची सविस्तर रूपरेषा अभ्यासक्रमाच्या रचनेत जाहीर केली जाणार आहे. नवीन बदलात विद्यापीठाने संधोधनावरही भर दिला आहे. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल, तर एक वर्षाचे असणार आहे.

चौथ्या वर्षात विद्यापीठ दोन पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवणार आहे. ज्यामध्ये सर्वसामान्य आणि दुसरे संशोधनवर आधारित असणार आहे. संशोधन केंद्र असणाऱ्या महाविद्यालयातच संशोधनावर आधारित असलेला पर्याय उपलब्ध असेल.

महाविद्यालयांना स्वातंत्र्य

चार वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम राबविण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांना असणार आहे. महाविद्यालयांना विद्यापीठाकडे त्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल. पायाभूत सुविधा, संशोधन केंद्र आदींचा विचार प्रस्तावात केला जाईल, असे सांगण्यात येते. रूपरेषा जाहीर केल्यानंतरच याबाबत अधिक स्पष्ट होतील असेही सांगण्यात येते.

विद्यापीठा अंतर्गत चार जिल्ह्यात ४५८ महाविद्यालये आहेत. त्यातील अनेक महाविद्यालये विद्यापीठाने पुढील वर्षात प्रवेशासाठी अपात्र ठरवली आहेत. त्यात अनेक महाविद्यालयांचे अकॅडमिक ऑडिट राहिलेले आहे. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

३८ अभ्यास मंडळे

विद्यापीठात ३८ अभ्यास मंडळे आहेत. नियुक्ती प्रक्रियेनंतर अभ्यासक्रमांची रूपरेषा ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली. मानव्यविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र व आंतरविद्याशाखेत ही अभ्यासमंडळे आहेत. यामध्ये लोकप्रशासन, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इंग्रजी, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, विधी, प्राणिशास्त्र, गणित, सूक्ष्मजीवशास्त्र, पदार्थ विज्ञान, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, अकाउंटस, एमबीए, शारीरिक शिक्षण, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक तत्त्वज्ञान, उर्दू, एमसीए, अभियांत्रिकी शाखेतील अभ्यास मंडळाचा समावेश आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आपण अनेक बदल करत आहोत. चार वर्षे, तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रम असणार आहे. त्यासाठीची रूपरेषा अंतिम करण्याचे काम सुरू आहे. नवीन नियमावली, रचना लवकरच जाहीर करण्यात येतील. चार वर्षांचा अभ्यासक्रम महाविद्यालयात असावा की नाही, याचे स्वातंत्र्य महाविद्यालय आहे.
– डॉ. प्रमोद येवले,कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची रचना करण्याचे काम सुरू आहे. स्ट्रक्चर स्पष्ट करण्यात आले, त्यानुसार अभ्यास मंडळांच्या बैठका सुरू आहेत. त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. चार वर्षांचा अभ्यासक्रम, त्याचे स्तर याबाबतही नियमावलीतून स्पष्ट केले जाईल.
– डॉ. श्याम शिरसाठ,प्र-कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Source link

Career Newscollegedegreeeducation newseducation PolicyNEPNEP 2023new educational policyनवीन शैक्षणिक धोरणपदवी चार वर्षांची
Comments (0)
Add Comment