विनायक चतुर्थी मुहूर्त आणि पूजेची वेळ
मंगळवार २३ मे रोजी, विनायक चतुर्थी आहे. मंगळवारी विनायक चतुर्थी आल्यामुळे हा अंगारक योग झाला आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे.
पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी २२ मे २०२३ रोजी रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल आणि २४ मे २०२३ रोजी सकाळी १२ वाजून ५७ मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार ज्येष्ठ विनायक चतुर्थी व्रत २३ मे रोजी वैध असेल. या दिवशी दुपारी गणेशाची पूजा केली जाते.
गणपती बाप्पाची पूजा करण्याचा मुहूर्त: सकाळी १० वाजून ५६ मिनिटे ते दुपारी १ वाजून ४० मिनिटे.
विनायक चतुर्थी पूजाविधी
या दिवशी सकाळी लवकर स्नान करून उपवास करावा आणि गंगेच्या पाण्याने पूजास्थानाचा अभिषेक करून पूजा सुरू करावी. श्रीगणेशाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण केल्यानंतर धूप-दीप, नैवेद्य, अक्षदा आणि त्यांचा आवडता दुर्वा अर्पण करावा. यानंतर मिठाई किंवा मोदकचा नैवेद्य दाखवाव. शेवटी व्रत कथा वाचून गणपतीची आरती करावी. यादिवशी चंद्र दर्शन करू नये.
विनायक चतुर्थीला काय करावे
विनायक चतुर्थी निमित्त प्रसन्न मनाने गणपतीची पूजा करताना अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे तसेच विनायक चतुर्थीच्या मंत्राचा जप करावा.
पूजा करण्यासाठी जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा वापर करावा.
दिवसभर उपवास करावा. दूध, फलाहार असा हलका आहार घ्यावा.
राग, लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करावा आणि त्यावर अंमल करावा.