हायलाइट्स:
- सुनील झंवर माझाच नव्हे सर्वांचा निकटवर्तीय!
- भाजप आमदार गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट.
- बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारात झंवर मुख्य सूत्रधार.
जळगाव: बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी नुकतीच अटक झालेला मुख्य सूत्रधार सुनील झंवर हा माझाच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांचा निकटवर्तीय असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. ( Girish Mahajan Sunil Zanwar Latest News )
वाचा:…तर तो ठाकरे कसला! नवीन जबाबदारीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था अर्थात बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे अटक केली. सुनील झंवर हा गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जात असल्याने तसेच त्यांच्या कार्यालयातील झडतीमध्ये महाजन यांच्या शस्त्र परवान्याच्या झेरॉक्स मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या गिरीश महाजन यांना याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी सुनील झंवर सर्वांच्या निकट असल्याचे सांगितले.
वाचा: आमदार नियुक्तीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; राज्यपाल कोश्यारींना धक्का
महाजन यांनी सांगितले की, बीएचआर पतसंस्था प्रकरणात कायद्यानुसार जे असेल ते होईल. अनेक लोकांना यात अटक झालेली आहे. यामध्ये पोलीस यंत्रणा त्यांची चौकशी करते आहे. यामधून जे निष्पन्न व्हायचे आहे ते होइल. सुनील झंवर माझेच नाही तर सर्वांचेच निकटवर्तीय आहेत, कुणाचे नाहीयेत? असा प्रश्न उपस्थित करीत सर्वच पक्षांशी त्यांचे संबध आहेत. माझ्या इतकेच सर्वांशी त्यांचे संबध आहेत. कुणी नाही म्हणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. बीएचआर प्रकरणी कायद्याप्रमाणे कारवाई झाली आहे. आता त्यातून काय ते निष्पन्न होईल, असेही महाजन यांनी शेवटी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून शेतकऱ्यांची पीके कोमेजू लागली आहेत. शेतकरी प्रंचड संकटात सापडला आहे. जिरायत व बागायत शेतीत जी काही पीके उभी आहेत ती पुरेसा पाऊस नसल्यामुळे रोगराईची शिकार ठरत आहेत, असे नमूद करत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी आज गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे,आमदार संजय सावकारे, स्मिता वाघ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर महाजन माध्यमांशी बोलले.
वाचा: मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली!; मित्रपक्षाच्या नेत्यानेच साधला निशाणा