डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश नोंदणी वेळीच विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेणार आहे. पदवी-पदव्युत्तर परीक्षेत ऐनवेळी येणाऱ्या परीक्षा अर्जांमुळे उडणारी धांदल, नियोजनाची तारांबळ त्यातून होणारे गैरप्रकार लक्षात घेत नोंदणीलाच परीक्षेचा अर्ज ही भरून घेण्याचे बंधन घालण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असेल.
विद्यापीठांकडून परीक्षा, निकालांचे वेळापत्रक पाळले जात नाही. अनेकदा परीक्षे दरम्यान परीक्षार्थी विद्यार्थ्यांना केंद्र बदल, बैठक व्यवस्थेचे नियोजन कोलमडणे, पायाभूत सुविधांचा अभाव अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही महाविद्यालयांकडून परीक्षेच्या काही तास आधी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात येतात. त्यामुळे हॉलतिकीट जनरेट न होणे, बैठक व्यवस्थेचे नियोजन करणे आदींबाबत प्रशासनावर ताण येतो.
अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थीसंख्या अधिकची दाखविली जाते. काही विद्यार्थ्यांचा केवळ नावापुरता प्रवेश असतो. नंतर हे विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यास टाळाटाळ करतात, असे सांगण्यात येते. त्यात काही विद्यार्थ्यांचे अर्ज अतिविलंबाचा दंड भरून सादर केले जातात. या प्रकारांमुळे विद्यापीठाने परीक्षांबाबत बदलाचे संकेत दिले असून प्रशासन यंदापासून प्रवेश नोंदणीवेळीच परीक्षेचा अर्ज भरून घेणार आहे.
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यापीठ निश्चित कालावधी देते. त्या दरम्यान महाविद्यालयांमध्ये प्रक्रिया पूर्ण केली जाते. या प्रक्रियेतच सत्र परीक्षांचे अर्ज भरून घेण्याबाबत प्रशासन तयारी करत आहे. त्यामुळे परीक्षांचे नियोजन सुलभ होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा राज्यातील पहिला प्रयोग असेल असेही सांगण्यात येते.
प्रवेश नोंदणीवेळीच भरावा लागणार अर्ज
पदवी, पदव्युत्तर परीक्षेसाठी परीक्षा अर्ज भरण्यास विद्यापीठाकडून वेळापत्रक निश्चित करण्यात येते. अनेकदा काही महाविद्यालयांचे अतिविलंबाने अर्ज सादर होतात. काही महाविद्यालये काही तास आधी अर्ज सादर करतात. हॉलतिकीट जनरेट होण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. मागील दोन सत्रात अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीट शिवाय परीक्षा देण्याची वेळ आली. त्यामुळे विद्यापीठ बदल करणार असल्याचे सांगण्यात येते.
प्रवेश नोंदणीवेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला तर सुरुवातीलाच विद्यार्थी संख्या निश्चित होईल. त्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्र निश्चिती, बैठक व्यवस्थेचे नियोजन करणे सुलभ होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. बॅकलॉग किंवा इतर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठीची व्यवस्था असणार आहे.
४५८
महाविद्यालयांची संख्या
११६
अनुदानित महाविद्यालय
३४२
विनाअनुदानित महाविद्यालये
१३४
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम संख्या
दोन लाख
दरवर्षी प्रवेशित होणारे विद्यार्थी
परीक्षा सुरळीतपणे व्हाव्यात, परीक्षांच्या नियोजनात सुसूत्रता यावर आम्ही भर देत आहोत. अनेकदा महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज सादर करण्यास उशीर होतो. अशा वेळी परीक्षेच्या नियोजनावर त्याचा परिणाम होतो. यामुळे प्रवेश घेतानाच महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज भरून घ्यावेत, असे बंधन त्यांना घालण्यात येईल. प्रवेशासाठी नोंदणी करतेवेळीच परीक्षेचा अर्ज भरून घेतला गेला तर नियोजन करणे सुलभ ठरेल.
– डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ