Girls Power In UPSC: यूपीएससीमध्ये मुलींचा झेंडा, पहिल्या चार क्रमांकावर पटकावले स्थान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

प्रशासकीय व्यवस्थेचा चेहरा ठरवणाऱ्या यूपीएससी परीक्षेचा २०२२चा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून देशात पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी यशाचा झेंडा रोवला आहे. दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतलेली इशिता किशोर ही देशात पहिली आली आहे. तर गरिमा लोहिया, उमा हराथी एन., स्मृती मिश्रा या अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या आल्या आहेत.

महाराष्ट्रातून बाजी मारलेलीही मुलगीच असून ठाण्याच्या डॉ. कश्मिरा संखे हिने हा मान पटकावला असून देशात ती २५वी आहे. पहिल्या १०० यशस्वी झालेल्यांच्या यादीमध्ये एकूण सातजण असून त्यात पाच मुलींचा समावेश आहे. अंकिता पुवार (२८), रुचा कुलकर्णी (५४), आदिती वषर्णे (५७), दीक्षिता जोशी(५८), श्री मालिये (६०), वसंत दाभोळकर (७६) हे विद्यार्थी यशस्वी ठरले.

‘देशात पहिली आले याचा मला खूप आनंद आहे. स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याची भावना मनात आहे’, असे इशिताने म्हटले आहे. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी काम करण्याची इच्छा असल्याचे तिने नमूद केले. देशात पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे असून पहिल्या २५ विद्यार्थ्यांमध्ये १४ मुलींचा समावेश आहे. दुसरे स्थान मिळवलेली लोहिया आण चौथ्या क्रमांकावर असलेली मिश्रा या दोघीही दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. तर हराथी हिने आयआयटी हैदराबादमधून शिक्षण पूर्ण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून फलदायी आणि समाधान देणारी कारकीर्द ठरो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. एकूण ९३३ जण प्रशासकीय सेवेसाठी पात्र झाले आहेत.

ठाण्याचे यश

ठाण्यातील डेंटिस्ट असलेली कश्मिरा राज्यात पहिली आली असून देशातून २५वे स्थान पटकावले आहे. रुग्णसेवा करताना कश्मिरा हिने मिळवलेले देदिप्यमान यश पाहून तिच्या कुटुंबीयांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ठाण्यातील श्रीनगर भागात राहणाऱ्या काश्मिराची मोठी बहीणही डेंटिस्ट असून यूपीएससी परीक्षा देण्याआधी कश्मिरा तिच्या क्लिनिकमध्ये काम करीत होती. यूपीएससीचा अभ्यास करताना मला बहिणीने सांभाळून घेतले. बऱ्याचदा रुग्णही खूप असायचे. त्यावेळी अभ्यास आणि क्लिनिक सांभाळावे लागत असे, असे कश्मिराने सांगितले. तिसऱ्या प्रयत्नानंतर तिला हे यश मिळाले आहे.

यूपीएससीत स्वप्नीलची हॅट्‌ट्रिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमाचा २०१२ मधील लाभार्थी स्वप्नील पवार याने तिसऱ्यांदा यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. रँकिंगमध्ये सुधारणा करीत यावेळी त्याने २८७वे स्थान मिळवले आहे. यापूर्वी २०२०मध्ये ६३५वे रँक मिळवत तो सेवेमध्ये रुजू झाला होता. तर २०२१मध्ये ४१८वी रँक मिळवत आयपीएस होण्याची संधी त्याला मिळाली. यंदा तिसऱ्यांदा परीक्षेत यश मिळवत त्याला ‘आएएस’ होण्याची संधी मिळणार आहे.

Source link

girls Power in UPSCGirls Topper in UPSCias resultMaharashtra Timesupscupsc 2022 final resultUPSC examupsc resultUPSC Success Storyupsc मार्किंग स्कीमयूपीएससी परीक्षायूपीएससी रिझल्टयूपीएससीमध्ये मुलींचा झेंडालोकसेवा आयोग
Comments (0)
Add Comment