CET Result: ‘सीईटी’ परीक्षांचा निकाल जाहीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे. टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होत आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून गुणपत्रिका प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांना लागून आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यभरात सीईटी परीक्षांचे आयोजन केले होते. पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. २५ मार्चला एमबीए अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेपासून यावर्षीच्या सीईटी परीक्षांना सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थी संख्येच्‍या आधारावर एक किंवा एकापेक्षा जास्त दिवसांकरिता अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षा पार पडल्या आहेत.

सद्यस्थितीत बहुतांश अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा झालेल्या असून, आता पुढील टप्प्यात निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.

हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील पदवी (बी. एचएमसीटी), आणि पदव्युत्तर पदवी (एम. एचएमसीटी) सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यासोबत बीए / बीएस्सी. बी. एड. (इंटिग्रेटेड), बी. प्लॅनिंग, एम.आर्क., फाइन आर्ट (एएसी-सीईटी), एम. पीएड., एमसीए, विधी शाखेतील ५ वर्षे व ३ वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांची एलएलबी सीईटी, बी. डिझाइन सीईटी या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे.

विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची जमवाजमव

सीईटी परीक्षांच्या निकालानंतर आता प्रवेश फेरीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत. राखीव जागांसाठी जात वैधता प्रमाणपत्रापासून अन्य विविध आरक्षणांसाठी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रवेश फेरी सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांकडून कागदपत्रांची जमवाजमव सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.

Source link

CETCET resultCommon Entrance TestMaharashtra TimesresultsState Common Entrance Testसीईटी निकाल
Comments (0)
Add Comment