गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्यास अखेर महापालिकेने परवानगी दिली आहे. करोनामुळे आर्थिक संकटात आलेल्या मंडळांना पालिकेच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र या जाहिरातींसाठी प्रशासनाने नियमावली बनवली असून, तिचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
करोनामुळे समाजातील सर्वच घटकांचे आर्थिक नुकसान झाल्याने गेल्या वर्षीपासून सार्वजनिक मंडळांना मिळणारी वर्गणी आटली आहे. मंडळांच्या प्रायोजकांनीही आखडता हात घेतला आहे. त्यात मागील वर्षी पालिकेने व्यावसायिक जाहिरातींना बंदी घातली. त्यामुळे उत्सव आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. यावर व्यावसायिक आणि आरोग्य विषयक जाहिराती घेण्यास मंडळांना आडकाठी आणू नये, असा आग्रह नुकत्याच पालिकेसोबत झालेल्या बैठकीत मंडळांनी धरला होता. त्यास प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पालिकेने याबाबत ११ ऑगस्ट, २०२१ रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात व्यावसायिक जाहिरातींच्या परवानगीची माहिती देण्यात आली आहे. मंडपांच्या प्रवेशद्वारापासून शंभर मीटरपर्यंतच्या अंतरात जाहिराती प्रदर्शित करण्यास १०१ रुपये तसेच शंभर मीटरबाहेर प्रवेशद्वार जाहिरातीसाठी एक हजार रुपये शुल्क आकारून परवानगी दिली जाणार आहे. (फक्त एका प्रवेशद्वारावर जाहिरात करता येईल.) रस्ते, फूटपाथवर जाहिरातीसाठी मनाई करण्यात आली आहे. मंडपाच्या आतील जाहिरातीसाठी सरसकट १२५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
मैदानांमधील मंडप शुल्कात कपात
पालिकेची उद्याने आणि मैदानात आयोजित केल्या जाणाऱ्या गणेशोत्सव मंडपांच्या परवानगी शुल्कात देखील मोठी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी हजारो रुपयांपर्यंत असलेल्या या शुल्कासाठी आता फक्त शंभर रुपये आकारले जाणार आहे. मंडपांचा आकार ५०० चौरस फुटांपेक्षा जास्त नसावा. उद्याने, मैदानांमध्ये सन २०१२पूर्वीपासून जी मंडळे उत्सव साजरे करतात, त्याच मंडळांना मंडप परवानगी दिली जाणार आहे. खासगी जमिनीवर पालिकेच्या धोरणानुसार शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाच्या १२ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
अशी आहे नियमावली
– गुटखा, तंबाखू, दारू उत्पादनाची जाहिरात करता येणार नाही.
– सिनेमा, दूरचित्रवाणी मालिकांच्या जाहिरातींमध्ये अश्लील जाहिरातींस प्रतिबंध
– जाहिरातींमुळे पदपथावरील पादचाऱ्यांना व रस्त्यावरील वाहतुकीला कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
– प्रवेशद्वाराच्या वरच्या आडव्या बाजूस ‘भक्तांचे हार्दिक स्वागत’ व उजव्या आणि डाव्या बाजूला व्यावसायिक जाहिराती करता येतील.
– करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि नागरिक संदेश लावणे बंधनकारक आहे.