नाशिकचा असलेला गौरव कायदेपाटील याने पुणे येथील सिहगड कॉलेज येथुन कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. अमेरिकन कंपनी टीबकोमध्ये नोकरी करत असताना त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम ए (लोक प्रशासन) ही पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. गौरव टिबको तसेच इन्फोसिस यांसारख्या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी करत होता. मात्र त्याचे ध्येय हे भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे होते. अधिकारी होण्याचा छंद अंगी भिनल्याने त्याला यूपीएससीचे स्वप्न स्वस्त बसू देत नव्हते. त्यामुळे त्याने पुण्यात स्पर्धा परीक्षांचे वीकेण्ड क्लासेस जॉइन केले. सन २०२१ मध्ये त्याने दिल्ली गाठत परीक्षेची तयारी केली.
यूपीएससीकडून सप्टेंबर २०२२ मध्ये लेखी परीक्षा पार पडल्या होत्या. आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती. लेखी परीक्षा, मुलाखती आणि व्यक्तिमत्व चाचणीच्या आधारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ९९३ उमेदवार यशस्वी ठरले आहे. त्यात नाशिकच्या तिघांचा समावेश आहे. गौरव गंगाधर कायदेपाटील हा १४६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत नोकरी करत असताना भारतात प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न तो पाहत होता. यासाठी गौरवने आयटी कंपनीच्या मोठ्या वेतनावर पाणी सोडत ‘आयएएस’ होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. त्याचे वडील बीवायके महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत असून, आईनेही विद्यार्थ्यांना धडे दिले आहेत. भाऊ चैतन्य हा केटीएचएम महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहे.