दहिवडीचा सुपुत्र ओंकार गुंडगे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अपार मेहनत घेत होता. पण त्याला यश मिळत नव्हते. पूर्व परीक्षा पास होऊनही मुख्य परीक्षेत त्याला अपयशाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्याने हार मानली नाही. यावेळच्या पाचव्या प्रयत्नात तो मुलाखतीसाठी पात्र झाला आणि देशात ३८० वा आला.
ओंकार हा सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अॅड. भास्करराव गुंडगे यांचा पुतण्या व येथील प्रथितयश कापड दुकानदार राजेंद्र गुंडगे यांचा पुत्र आहे. ओंकारचे माध्यमिक शिक्षण मेरीमाता इंग्लिश स्कूल मीडियम म्हसवड येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण रुईया कॉलेजमधून झाले. तर पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजातून २०१७ साली त्याने बीएसएलएलएलबी ही पदवी मिळवली. या पदवीच्या तिसऱ्या वर्षी तो विद्यापीठात प्रथम आला होता.
त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी तो दिल्लीला गेला. चार प्रयत्नात पूर्व परीक्षा पास होऊनही मुख्य परीक्षेत त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र, पाचव्या प्रयत्नात मुलाखतीसाठी पात्र होऊन देशात ३८० वा आला. या यशानंतर ओंकारवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक मान्यवरांनी भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या.
हे माझं आवडत स्वप्न होतं. मला स्वतःला कलेक्टर व्हायचं होतं. आज माझं स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण केल्याने मला खूप आनंद झाल्याचे ओंकारची आई सुवर्णा गुंडगे सांगतात.
सोशल मीडियावरील गोष्टींवर विश्वास न ठेवता शिस्तबद्धपणे आठ ते दहा तास अभ्यास केला तरी यश मिळवता येते. व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा असून, त्यामुळे आपल्याला अभ्यासासाठी ऊर्जा प्राप्त होते, असे ओंकारने सांगितले.