कधी सुरू होतोय श्रावण महिना
हिंदू पंचांगानुसार, यावेळी श्रावण महिना सुमारे २ महिन्यांचा असणार आहे. श्रावण महिना १८ जुलै २०२३ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर पर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण ५९ दिवस भाविकांना भगवान शंकराची आराधना करण्याची संधी मिळणार आहे. १९ वर्षांनंतर हा शुभ संयोग घडल्याचे सांगितले जात आहे. या वेळी १८ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान मलमास असेल. म्हणजेच या वेळी श्रावणामध्ये भगवान शंकरासोबतच भगवान विष्णूचाही आशीर्वाद मिळणार आहे.
ज्योतिषीय गणनेनुसार, सौर वर्ष ३६५ दिवस, ६ तास आणि ११ सेकंदाचे असते. पण चांद्रवर्ष ३५४ दिवस आणि ९ तासांचे असते. अशा स्थितीत, दरवर्षी चांद्र वर्षात सौर वर्षापासून सुमारे ११ दिवसांचा फरक असतो. अशा स्थितीत सौर वर्ष आणि चांद्र वर्षाचा ताळमेळ राखण्यासाठी एका मलमासानंतर दुसरा मलमास ३२ महिने, १६ दिवसांनी पुन्हा येतो. अशाप्रकारे दर तिसऱ्या वर्षी अधिक मास होतो. असाच योगायोग तब्बल १९ वर्षांनंतर या वेळी श्रावण महिन्यात घडला आहे. त्यामुळे या वर्षी श्रावण महिन्यात अधिक मास होणार आहे.
श्रावण महिन्याचे महत्व
श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. तसेच श्रावणात शिव प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते.