ब्रेल लिपीतील पुस्तकांचा आधार आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजय खंदारे या अंध विद्यार्थ्याने बारावीत कला शाखेत ७० टक्के गुण मिळविले. केटीएचएम कॉलेजमध्ये आर्ट शाखेत दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये तो प्रथम आला आहे. मजुरी करणाऱ्या आपल्या कुटुंबाला प्रकाशवाट दाखविणाऱ्या अजयला, स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जायचे आहे.
अजयचे कुटुंब मुळचे हिंगोली जिल्ह्यातील. वीस वर्षांपूर्वी कामासाठी हे कुटुंब नाशिकमध्ये स्थलांतरित झाले. जिथे बांधकाम सुरू असेल तिथे त्यांचे घर. बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करणारे वडील आणि त्याच ठिकाणी इतर घरांमध्ये धुणी-भांडी करणारी आई, हे अजयचे कुटुंब. शंभर टक्के अंधत्व असलेल्या अजयला लहानपणापासूनच आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव होती.
आई सुजाताचे शिक्षण तिसरीपर्यंत, तर वडील अमृता यांचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले. पण मुलाचा अंधपणा आणि आपली गरिबी याचा कोणताही परिणाम त्याच्या शिक्षणावर होऊ नये, याची काळजी घेत त्याच्या पालकांनी शिक्षणासाठी नेहमीच पाठिंबा दिला. पहिली ते चौथी शासकीय अंध शाळा, पाचवी ते दहावी के. जे. मेहता हायस्कूल आणि केटीएचएम महाविद्यालयामध्ये अजयने शिक्षण घेतले. दहावीला ७० टक्के मार्क मिळविणाऱ्या अजयने बारावीतही तीच परंपरा कायम ठेवली. आता पुढे कला शाखेत पदवी शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत जाण्याची त्याची इच्छा आहे. या सगळ्या प्रवासात आई-वडिलांसोबतच शाळा, केटीएचएम कॉलेजच्या शिक्षकांचा पाठिंबा आणि परीक्षेत पेपर लिहिणाऱ्या रायटरची मदत महत्त्वपूर्ण ठरल्याचे अजयने सांगितले.
…असा केला अभ्यास
महाविद्यालयातून आल्यानंतर दररोज दुपारी चार ते रात्री दहा यावेळेत अजय अभ्यास करीत असे. ब्रेल लिपिच्या पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास केल्यानंतर महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आणि त्यांचे मनन करणे यावर त्याने भर दिला. अभ्यास करत असताना, न समजणारे मुद्दे सगळ्यात शेवटी पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न अजयने केला. वर्षभर याच पद्धतीने अभ्यास करून त्याने ही चमकदार कामगिरी केली.
तेजश्रीला व्हायचंय सीए!
तेजश्री दुसाने या अंध विद्यार्थिनीने ८३.१७ टक्के गुणांसह कॉमर्स शाखेत यश मिळविले आहे. केटीएचएम महाविद्यालयात ती दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आली आहे. अंधत्वाचे प्रमाण ६० टक्के असल्याने रात्री अभ्यास करण्याचे टाळून, दिवसा अभ्यास करण्यास तेजश्रीने प्राधान्य दिले. मॅग्निफायर गॉगल वापरून दररोज किमान दोन ते तीन तास अभ्यास तिने केला. इथून पुढे आपले सीए बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तेजश्रीने सांगितले.
दिशा मकर विज्ञान शाखेत अव्वल
अंशत: वाचादोष असणाऱ्या दिशा मकर या विद्यार्थिनीने ७१.८३ टक्के गुणांसह केटीएचएम महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. जेईई मेन परीक्षेतही ती उत्तीर्ण झाली असून, आता जाईई अॅडव्हान्सड्साठी ती तयारी करीत आहे. मित्र-मैत्रिणींशी चर्चा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन, यू ट्यूबवरील व्हिडीओंच्या माध्यमातून तिने बारावीचा अभ्यास केल्याचे तिचे वडील पंकज मकर यांनी सांगितले. भविष्यात तिला संगणक अभियंता व्हायचे आहे.