‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असून, त्यांच्या परीक्षा पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, हा बदल लागू होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने होतील,’ असे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा होण्याबाबत अनेक पालकांमध्ये संभ्रम आहे. समाजमाध्यमांवरही विविध चर्चा सुरू असतात. त्यातच येत्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्य मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा होणार असल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले.
गोसावी म्हणाले, ‘त्याशिवाय पाचवी आणि आठवीच्याही परीक्षा घेण्याबाबत नमूद केलेले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सत्र पद्धतीने घेण्यात याव्यात, असे सुचविण्यात आले आहे. त्याला अनुसरून राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमाच्या आराखड्याचा मसुदा जाहीर करण्यात आला आहे. या मसुद्यावर शैक्षणिक घटकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. या मसुदा अंतिम झाल्यानंतर, राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येईल. त्याची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारकडून सूचना आल्यानंतर, परीक्षा पद्धतीत बदल होणार आहेत. त्यासाठी आणखी काही कालावधी जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा बदल लागू होणार नाही,’ असेही गोसावी यांनी सांगितले.
नव्या शैक्षणिक धोरणात दहावी-बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ परीक्षांच्या पद्धतीत बदल सुचविण्यात आले आहे.
– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ