हायलाइट्स:
- चिपळूणमध्ये महापूर का आला?
- दक्षिण कोरियन संस्था करणार सर्व्हे
- चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी अनेक संस्था सरसावल्या
चिपळूण : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे आलेल्या महापुराची आणि धरणांची सुरक्षा आता पूर व्यवस्थापन, जल व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दक्षिण कोरियन ‘वायओओआयएल’ संस्थेने घेतली आहे. या संस्थेकडून वाशिष्ठी नदीचाही सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या संस्थेची तज्ञ मंडळी येथे दाखल झाली आहेत.
ते गेले दोन दिवस वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण करीत महापुराच्या कारणांचा शोध घेत आहेत. महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरमुक्ती जलव्यवस्थापनाबाबतचा अहवाल ते केंद्र सरकारला देणार आहेत. महापुरात वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ, अतिवृष्टी, कोयनेचे अवजल, पूररेषेत वाढलेली बांधकामे व त्यासाठी केलेला भराव अशी विविध कारणे पुढे येत आहेत.
या पार्श्वभूमीवर विविध तज्ज्ञ व अभ्यासक आपापली मते मांडत असून चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी अनेक संस्था सरसावल्या आहे. राज्य केंद्र स्तरावर या महापुराची दखल घेतलेली असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वायओओआयएल’ या दक्षिण कोरियन संस्थेनेही दखल घेत चिपळूणला पूरमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या संस्थेचे हायड्रोलिक अभियंता ओम जांगीड व भूतंत्रज्ञ मनीष खरगपूर यांनी चिपळूणला भेट दिली. येथील वाशिष्ठी नदीपात्राची तसेच लगतच्या परिसराची पाहणी केली. गेले दोन दिवस हे काम सुरू होते. लघुपाटबंधारे विभागातील अभियंता विष्णू टोपरे व अन्य अधिकारी तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यावेळी उपस्थित होते.