राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेची सूचना मंडळामार्फत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी सोमवारपासून (२९ मे) अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, कनिष्ठ महाविद्यालयांना १६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे जमा कराव्या लागणार आहेत.
बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना पुरवणी परीक्षेद्वारे परीक्षेची संधी दिली जाते. त्यासोबतच अनेक विद्यार्थी आपली श्रेणी सुधारण्यासाठी, तसेच आयटीआय ट्रान्स्फर क्रेडिट घेणारे विद्यार्थी, खासगी प्रविष्ट विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत ही परीक्षा द्यावयाची आहे, त्यांना पुरवणी परीक्षा व फेब्रुवारी-मार्च २०२४ अशा परीक्षेच्या दोनच संधी उपलब्ध राहणार आहेत. तसेच बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्च २०२३ च्या परीक्षेतील माहिती ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रात घेता येणार आहे.
…अशा आहेत महत्त्वाच्या तारखा
२९ मेपासून : विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध
९ जूनपर्यंत : विद्यार्थ्यांना निमयित शुल्क भरून हे ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार
१० ते १४ जूनदरम्यान : विलंब शुल्क भरून अर्ज दाखल करता येणार
संबंधित ज्युनिअर कॉलेज किंवा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे अर्ज दाखल करावे लागणार
१ ते १५ जूनदरम्यान : संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजला चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावे लागणार
१६ जूनपर्यंत : चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे जमा करण्यासाठी मुदत