पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, शक्रवार सायंकाळपर्यत १२ हजार ७१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावीचा प्रवेश अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी ही प्रक्रिया दहावीच्या निकालापूर्वी सुरू करण्यात येते. त्यानुसार २५ मे पासून अर्जाचा भाग एक भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
१६ लाख विद्यार्थी
पुणे व पिंपरी-चिंचवड, मुंबई महानगर, नाशिक, अमरावती, नागपूर अशा पाच महापालिका क्षेत्रातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीला प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. राज्यभरातून साधारण १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यापैकी अनेकांना अकरावीला प्रवेश घ्यायचा असल्याने, ते उत्सुकतेने प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत असतात. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्याने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर, त्याला अर्जाचा भाग एक भरता येत आहे.
विद्यार्थ्यांना भाग एकमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख अशी वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्यानंतर या अर्जांचे संगणकीय प्रणालीद्वारे व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. आतापर्यत १२ हजार ७१४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी दोन हजार १४६ विद्यार्थ्यांचे अर्ज ‘ऑटो व्हेरिफाइड’ झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होईपर्यत भाग एक भरता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी निकालानंतर आणखी दोन ते तीन दिवस ही सुविधा सुरू राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी https://pune.11thadmission.org.in/ या लिंकचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहेत.
निकालानंतर अर्जाचा भाग दोन
दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील दहा ते पंधरा दिवस हे अर्जातील भाग दोन म्हणजे प्रामुख्याने कॉलेजांचे पसंतीक्रम भरायचे आहेत. या पसंतीक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलजे जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी ९८२३००९८४१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अडचणींसाठी 11thonlineadmissiondydpune@gmail.com या क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.