बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शहरातील कॉलेजांनी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काही कॉलेजांचे प्रवेश अर्ज आज शुक्रवारी २६ मे पासून, तर काहींचे एक जूनपासून कॉलेजांचे वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती प्राचार्यांनी दिली आहे. बारावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी जाहीर झाल्याने, विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवायला कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष हे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेकडे लागले असते. आपल्याला नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळावा, अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेच्या तारखांबाबत माहिती हवी असते. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नामवंत महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर बारावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याला दिलेल्या वेळेत आपला प्रवेश शुल्क भरून निश्चित करावा लागणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अशी माहिती प्रार्चांयानी दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने www.unipune.ac.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जून महिन्याच्या अखेरीस प्रवेश परीक्षा होणार आहे. या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे प्रवेश होणार आहे. यातील काही अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीही देण्यात येते.
बीएमसीसीमध्ये बी-कॉमचे प्रवेश हे बारावीच्या गुणांवर होणार आहेत, तर इतर अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना वेबसाइटलक अधिक माहिती मिळेल.
– डॉ. जगदीश लांजेकर, प्राचार्य, बीएमसीसी
आमच्या कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आजसकाळी दहा वाजल्यापासून अर्ज करता येणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अर्जाची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर चार-पाच दिवसांत गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानुसार पदवी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापकांच्या टीम तयार केल्या आहेत.
– डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर
कॉलेजमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया प्रामुख्याने बारावीच्या गुणांवर होणार आहेत. येत्या काही दिवसांत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून, त्यासाठी आवश्यक बाबाींची पूर्तता करण्यात येत आहे.
– डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य, अण्णासाहेब मगर महाविद्यालय
पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांकडून विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पहिली पसंती आमच्या कॉलेजला असते. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी वेबसाइटला भेट द्यावी.
– डॉ. मनोहर चासकर, प्राचार्य, प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय