हायलाइट्स:
- कंपनीचा मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी
- कंपनी लागलेल्या आगीत १८ कामगारांचा मृत्यू
- मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत
पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे-पिरंगूट एमआयडीसीमधील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनी लागलेल्या आगीत १८ कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कंपनी मालक निकुंज शाह यास 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या भीषण आगीच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे मालक निकुंज बिपीन शहा, बिपीन जयंतीलाल शहा, केयुर बिपीन शहा यांच्याविरोधात भादवि कलम ३०४(२), २८५, २८६ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खरंतर, या कंपनीत आठच दिवसांपूर्वी छोटी आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. या आगीनंतरच या कंपनीने भविष्यात आग लागू नये याची काळजी घ्यायला हवी होती. मात्र, तशी काळजी घेतलेली दिसत नाही. तशी काळजी घेतली गेली असती तर मोठी आग लागून मनुष्यहानी झाली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आगीची घटना घडल्यानंतर या आगीची सविस्तर चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशी समितीने आपल्या चौकशीचा अहवाल येत्या दोन दिवसात द्यावा असे आदेश या समितीला देण्यात आले होते.
या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्याच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच केंद्र सरकारने देखील मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकार मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देणार आहे.