मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिकांच्या हद्दीतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी नोंदणी करण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून मुंबईतील कॉलेजांमध्ये गेल्या तीन दिवसांत ४९ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
राज्य मंडळाकडून लवकर दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण विभागाकडून लागलीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना कॉलेजचा पसंती क्रमांक नोंदविण्याचा पर्याय दिला जाणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया जलद गतीने पार पडावी, यासाठी शिक्षण विभागाने निकाल लागण्यापूर्वी २५ मेपासून विद्यार्थ्यांची वेबसाइटवर नोंदणी करून घेण्यास सुरुवात केली आहे.
तसेच प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यासही सुरुवात केली. याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत ४९ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यातील २,२४६ विद्यार्थ्यांचे अर्ज रविवारपर्यंत मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून देण्यात आले होते.
शिक्षण विभागाने यापूर्वीच अकरावी प्रवेशाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर पुढील पाच दिवसांनी विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेबसाइटवर कॉलेजचा पसंतीक्रम नोंदविण्यास सुरुवात करता येईल. दहावीच्या निकालानंतर पुढील १० ते १५ दिवसांत शिक्षण विभागाकडून पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ही पहिली फेरी पार पडल्यानंतर प्रत्येकी सात ते नऊ दिवसांच्या फरकाने आणखी दोन फेऱ्या पार पडतील. तसेच दोन विशेष फेऱ्यांसाठी प्रत्येकी सात दिवसांचा कालावधी दिला जाईल, असे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.
ऑगस्टअखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन
प्रत्येक फेरीसोबतच समांतर कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रियाही राबविली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्टअखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले. यातील पहिल्या विशेष फेरीनंतर लागलीच अकरावीचे वर्ग सुरू होतील.