हायलाइट्स:
- पुन्हा एकदा कोसळली दरड
- रस्त्यावरील ढिगारे हटवण्यात आले, पण अजूनही काम पूर्ण नाही
- केवळ दुचाकी आणि चार चाकी वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी
कोल्हापूर : आंबा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. दुपारी तीन वाजता ही दुर्घटना घडली. त्यानंतर मातीचे ढिगारे काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. तसंच फक्त चार चाकी लहान वाहनांना वाहतुकीला परवानगी देण्यात आली.
कोल्हापुरात १५ दिवसापूर्वी सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडला होता. यामुळे जिल्ह्यातील आंबा, आंबोली आणि करूळ घाटातील दरड कोसळली होती. यामुळे कोल्हापूर ते गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आंबा घाटात तर चार दिवस काम सुरू होते. त्यामुळे कोकणाशी संपर्क तुटला होता.
कोकणात आलेला महापूर आणि त्याच वेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा आवश्यक असलेला संपर्क तुटल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. बांधकाम विभागाने चार दिवसाच्या प्रयत्नानंतर मातीचे ढिगारे हलवले. त्यानंतर वाहतुकीला सुरुवात झाली होती.
दरम्यान, आज दुपारी तीन वाजता आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मातीचे ढिगारे पडल्याने काही काळ वाहतूक बंद करावी लागली. त्यानंतर रस्त्यावरील ढिगारे हटवण्यात आले, पण अजूनही काम पूर्ण झाले नाही. आता केवळ दुचाकी आणि चार चाकी वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. या मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.