मुंबई विद्यापीठाने तब्बल १२९ दिवसांनी एलएलएम सत्र २ परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला. मात्र या निकालातही त्रुटी असून अनेक विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.
मुंबई विद्यापीठाने एलएलएमच्या द्वितीय सत्राची परीक्षा जानेवारीमध्ये घेतली होती. ही परीक्षा १८ जानेवारीला संपली. या परीक्षेला चार महिने उलटून गेल्यानंतरही त्याचा निकाल लागला नाही. परिणामी विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अखेर विद्यापीठाने शनिवारी या परीक्षेचा निकाल जाहीर केला. मात्र या निकालातही विद्यापीठाने गोंधळ घातला आहे. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविल्याचा प्रकार घडला आहे.
‘विद्यापीठाने एका परीक्षेत गैरहजर दाखविले आहे. तर अन्य तीन परीक्षांत हजर दाखविले आहे. मात्र मी सर्व पेपर दिले असून परीक्षेवेळी पर्यवेक्षकांनी प्रवेशपत्रावर सहीदेखील केली. मात्र विद्यापीठाने हा प्रकार केल्याने त्रासाला सामोरे जावे लागणार आहे,’ अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने व्यक्त केली. तर विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्यात आले आहे. विद्यापीठाने आधीच निकालाला विलंब केला आहे. त्यातही त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नाही, असे अॅड. सतीश शेरखाने यांनी सांगितले.
‘विद्यापीठाने काही विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविले आहे. गैरहजर दाखविण्याचा गोंधळ दरवेळी उडतो. हा गोंधळ लवकर सुधारावा. तसेच विद्यापीठाने निकाल जाहीर करण्यास चार महिने लावले. या निकालातही तफावत आहे. ज्या विद्यार्थ्यांना दोनपेक्षा अधिक विषयांत नापास केले आहे, त्यांचे उत्तरपत्रिका फेरतपासणीचे निकाल आधी लावावेत. त्यानंतरच तिसऱ्या सत्राची परीक्षा घ्यावी,’ अशी मागणी युवा सेनेचे उपसचिव सचिन पवार यांनी केली.
कॉलेज, विद्यार्थ्यांच्या चुका
‘काही कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या चुकांमुळे काही विद्यार्थ्यांचे निकाल हे राखीव अथवा गैरहजर राहिलेले दिसत आहेत. या विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच जाहीर केले जातील,’ असे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे.