हायलाइट्स:
- बांगलादेशी घुसखोरांकडे भारतीय पासपोर्ट
- बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या भारतीय पासपोर्टवर परदेशात
- ठाणे, सुरतमधून चार बांगलादेशी नागरिकांना अटक
ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे भारताचा पासपोर्ट मिळवत बांगलादेशी घुसखोरांना परदेशात पाठवले जात असल्याची धक्कादायक बाब ठाणे गुन्हे शाखेने (युनिट १) केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. ठाणे आणि सुरतमधून गुन्हे शाखेने एकूण चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून ५ बनावट जन्मदाखले, ४ आधारकार्ड, ४ पॅनकार्ड, बांगलादेशातील ४ सिमकार्ड, बांगलादेश बँकेचे दोन एटीएम कार्ड, बांगलादेशी नागरिकांचे १२ भारताचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.
राजू उर्फ फारुख सफी मोल्ला (२९), त्याची पत्नी श्रीती राजू मोल्ला उर्फ सुमी (२६), मोहम्मद इमोन मोईन खान (३८), मोहम्मद सैपुल अलाउद्दीन मोल्ला (३६) अशी या अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. सर्वजण सुरतमध्ये राहत असून न्यायालयाने त्यांना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
बांगलादेशी नागरिकांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट तयार करून देणारा एक बांगलादेशी घुसखोर कळव्यातील विटावा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांच्या पथकाने विटाव्यातील एका मैदानाजवळ लावलेल्या सापळ्यात राजू उर्फ फारुख मोल्ला अडकला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये तो बांगलादेशी नागरिक असून त्याने भारतात बेकायदा घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याने आपण भारतीय नागरिक असल्याचे दाखवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र बनवले असल्याची बाब समोर आल्याने या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच राजूला पोलिसांनी अटक केली.
राजूच्या चौकशीमध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. तो आणि त्याच्या साथीदारांनी बांगलादेशी नागरिकांची सुरतमध्ये बनावट कागदपत्रे तयार केली असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काकड आणि पोलीस उप निरीक्षक कैलास सोनावणे यांचे पथक राजूला घेऊन सुरतला धडकले. गुजरात पोलिसांची मदत घेऊन एकूण ११ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी ठाण्यातील गुन्ह्यात तिघांना अटक केले तर उर्वरित आठ बांगलादेशीना गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गुन्ह्याची अशी होती पद्धत…
गुन्हे शाखेने केलेल्या सखोल चौकशीमध्ये गुन्हा करण्याच्या पद्धतीचा उलगडा झाला. छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केल्यानंतर बांगलादेशी नागरिक पश्चिम बंगालमध्ये एजंटच्या मदतीने बनावट कागदपत्रे आणि खोट्या पुराव्याच्या आधारे जन्मदाखला, आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करत असे. त्यानंतर ते भारतातील वेगवेगळ्या शहरामध्ये राहण्यासाठी जात असत. त्याठिकाणी गेल्यानंतर भाड्यावर घर घेतल्यानंतर स्थानिक पत्ता टाकून आधारकार्डवरील पत्ता ऑनलाईन अर्ज करून बदलून घेतात.
या कागदपत्रांच्या आधारे बँकेत खातेही उघडतात. त्यापैकी काही इन्कम टॅक्स रिटर्न फाईलही करतात. नंतर पासपोर्टसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर याच कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिक भारताचा अधिकृत पासपोर्ट मिळवत असल्याची बाब चौकशीमध्ये स्पष्ट झाली. या पासपोर्टचा वापर करून बांगलादेशी नागरिकांना मॉरीशियस, मालदीव, बांगलादेशमध्ये पाठवले जात असल्याची बाब समोर आली. बांगलादेशी महिला देखील भारतीय पासपोर्टचा वापर करून वेगळ्या कारणासाठी मालदीवला जात असल्याची बाब निष्पन्न झाली आहे.