PM Shri School: ‘पीएमश्री’ शाळांना दहा महिन्यांपासून निधीची प्रतीक्षा

परभणी : केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ‘पीएमश्री’ योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील निजामकालीन ११ जिल्हा परिषद शाळांची निवड झालेली आहे. या शाळांना पाच वर्षांत प्रत्येकी एक कोटी ८८ लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. एकूण १९ कोटी ८० लाखांचा निधी उपलब्ध होईल. मात्र, दहा महिन्यांनतरही या शाळांना निधीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

परभणी तालुक्यातील दैठणा, सेलूतील डासाळा, गंगाखेड येथील राणी सावरगाव, जिंतूरमधील केंद्रीय प्राथमिक शाळा चारठाणा, मानवतमधील इरळद व केंद्रीय प्राथमिक शाळा, मानवत, पाथरीमधील वडी व माळीवाडा, पाथरी, पूर्णा येथील अवई, पालममध्ये पारवा, सोनपेठ येथील डिघोळ या ११ शाळांची पीएमश्री योजनेत निवड झाली आहे.

या योजनेतून शाळांचे चित्र पालटणार आहे. मात्र, निधी केव्हा, कधी, कसा मिळणार आणि पहिल्या टप्प्यात कोणती कामे हाती घेतली जातील. याबद्दल अजूनही स्पष्टता नाही, असे डासाळा येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील शिखरे यांनी सांगितले.

शिक्षकांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम व स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेचे विद्यार्थी पात्र ठरतात. नुकतीच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या श्रीहरिकोटा येथील इस्रोमध्ये शैक्षणिक विमान सहलीसाठी निवड झाली होती. आता पीएमश्री योजनेतून शाळा आणखी आनंददायी होणार आहे. सर्वांना उत्सुकता लागली आहे.
– स्नेहल गजमल, विद्यार्थिनी

रोजगारक्षम व कौशल्य संवर्धन शिक्षणासाठी खास अभ्यासक्रमावर या योजनेअंतर्गत भर दिला जाणार आहे हे विशेष.‌ यामुळे शाळांमधील विविध उपक्रमांना बळ मिळेल.‌ डासाळा शाळेला एक‌ आदर्श मॉडेल स्कूल करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे.
– रामनाना पाटील खराबे, माजी जि. प. सदस्य, डासाळा

पहिली ते आठवीपर्यंत ३४३ विद्यार्थी संख्या आहे. अकरापैकी पाच वर्गखोल्या निजामकालीन आहेत. या योजनेअंतर्गत शाळेच्या निवडीचे श्रेय शाळा समिती, शिक्षकांच्या मेहनतीला; तसेच विद्यार्थ्यांना आहे. या संधीचे सोने करण्यासाठी सर्व जण कटिबद्ध आहोत.

– सुशील शिखरे, मधुकर काष्टे, अध्यक्ष व सचिव शाळा समिती, डासाळा

सेलू (जि. परभणी) तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची ‘पीएमश्री’ योजनेअंतर्गत निवड झाली आहे.

Source link

Career Newseducation newsMaharashtra TimesPM shreePM Shree SchoolPM shree schoolsschoolपीएम श्री शाळा निधीपीएमश्री शाळा
Comments (0)
Add Comment