यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सुरु झाली. विभागात चार जिल्ह्यांत ६८ परीक्षा केंद्रावरून विविध अभ्यासक्रमांचे ४९ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात बीए, बीकॉम, एमए, एमबीए अशा विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेला नुकतीत सुरुवात झाली. विभागीय केंद्राच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव जिल्हे येतात. यातील विविध महाविद्यालयांत विद्यापीठाचे अभ्यास केंद्र आहेत. अर्धवट शिक्षण सोडावे लागलेले विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम पूर्ण करतात.
विभागातील अभ्यास केंद्रावर विविध १०४ अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतात. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली. ६८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली. या केंद्राहून ४९ हजार ४१६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २० परीक्षा केंद्रावरुन १३ हजार १८६, बीड जिल्ह्यात २७ परीक्षा केंद्रावरुन १८ हजार ९७५ विद्यार्थी, जालना जिल्ह्यात १२ परीक्षा केंद्र, नऊ हजार परीक्षार्थी विद्यार्थी तर धाराशिव जिल्ह्यात नऊ परीक्षा केंद्रावरुन नऊ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विविध अभ्यासक्रमांच्या या परीक्षा १७ जूनपर्यंत असणार आहेत.
असे अभ्यासक्रम..
बीए, बीकॉम, एमए, बीएड अशा कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांसह गांधी विचार दर्शन पदविका शिक्षणक्रम, नाट्यशास्त्र पदविका शिक्षणक्रम, शालेय व्यवस्थापन पदविका, मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रम, बालसंगोपन आणि रंजन प्रमाणपत्र शिक्षणक्रम, शालेय व्यवहारांकरिता माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान प्रमाणपत्र शिक्षणक्रम, आशययुक्त अध्यापन पद्धती प्रमाणपत्र, मूल्यशिक्षणाची मुलतत्वे प्रमाणपत्र असे १०४ अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात आले होते.
जिल्हा ….. परीक्षा केंद्र….. परीक्षार्थी
छत्रपती संभाजीनगर २० १३१८६
बीड २७ १८९७५
जालना १२ ९०००
धाराशीव ९ ९०००
विद्यापीठाच्या प्रमाणपत्रापासून ते पदव्युत्तर परीक्षा सुरळीत सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. चार जिल्ह्यात ६८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
डॉ. रमेश शेकोकर, विभागीय संचालक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ.