महापालिकेतील अत्यावश्यक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ११४ पदांवर भरती करण्यासाठी पालिकेने जाहिरात तयार केली असून शासन नियुक्त संस्थेच्या माध्यमातून भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्य शासनाने महापालिकेच्या नवीन आकृतिबंधाला आणि सेवाभरती नियमांना मंजुरी दिली आहे. नवीन आकृतिबंधानुसार पालिकेतील पदांची संख्या पाच हजार २०२ झाली आहे. त्यापैकी २९६५ पदांवर अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत, तर दोन हजार २३७ पदे रिक्त आहेत. पालिकेचा आस्थापना खर्च लक्षात घेता सर्वच्या सर्व दोन हजार २३७ पदांची भरती करणे शक्य नाही.
त्यामुळे अत्यावश्यक पदांवर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला. सरकारनेदेखील त्याला मान्यता दिली. आस्थापना खर्चाच्या मर्यादेत राहून अत्यावश्यक पदांवर भरती करा, असे निर्देश सरकारने महापालिकेला दिले. त्यानुसार ११४ पदांवर भरती करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली.
भरती करण्यासाठी सरकारने सहा संस्थांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी एका संस्थेच्या माध्यमातून भरती करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देशदेखील सरकारने महापालिकेला दिले. त्यानुसार पालिका प्रशासनाने ११४ पदांवरील भरतीसाठी जाहिरात तयार करून ती संबंधित संस्थेकडे पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या माहितीला दुजोरा दिला.
जाहिरात संबंधित संस्थेकडे पाठवली आहे. संस्थेकडून लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल. दोन ते तीन महिन्यांत ११४ पदांवरची भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.