राज्यातील नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा येत्या ११ जूनला राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी हॉलतिकीट लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध प्रवेशक्षमतेच्या तुलनेत अर्ज अधिक आले आहेत. त्यामुळे यंदा प्रवेशासाठी चुरस राहणार आहे.
राज्यातील विविध सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये बी-एस्सी नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी, राज्यातील ३१ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २६ हजार ३११ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. बीएसस्सी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, राज्य़ातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांत रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात.
करोनानंतर आरोग्य क्षेत्राला सक्षम करण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर पदभरती होत आहे. मोठ्या संख्येने नवी रुग्णालये सुरू होत आहेत. या पदभरतीत नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. यंदाची सीईटी परीक्षा येत्या ११ जूनला होणार आहे. परीक्षेसाठीचे हॉलतिकीट ‘सीईटी सेल’च्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना ते डाउनलोड करता येणार आहे, अशी माहिती ‘सीईटी सेल’चे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी अधिक आणि सविस्तर माहितीसाठी ‘सीईटी सेल’च्या https://cetcell.mahacet.org/ या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जागांपेक्षा अर्ज तिपटीने अधिक
राज्यात पाच सरकारी महाविद्यालये असून, त्यात २५० जागा आहेत. १४३ खासगी महाविद्यालयांत सात हजार ११० जागा उपलब्ध आहेत. राज्यात प्रवेशासाठी एकूण सात हजार ३६० जागा उपलब्ध आहेत. त्या तुलनेत अर्जांची संख्या २६ हजार ३११ आहे. जागांसाठी तिपटीपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. अशा परिस्थितीत प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर चुरस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.