डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०२३-२४ शैक्षणिक वर्षांसाठी संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेश क्षमतेसंदर्भातील तात्पुरती यादी बुधवार ३१ मे रोजी जाहीर केली. ३७१ महाविद्यालयातील बीए, बीकॉम, बीएस्सीसह १२५ अधिक अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता जाहीर केली. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी, पालकांनाही यादी उपलब्ध करून दिली आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी, पालकांचे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे लक्ष लागले आहे. विद्यापीठाने २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश पात्र महाविद्यालये, प्रवेश क्षमता यासह कोणती महाविद्यालये प्रवेशास पात्र नाहीत, प्रवेश क्षमता किती कमी केली याची महाविद्यालय निहाय यादी जाहीर केली.
यामध्ये ४७१ महाविद्यालये दर्शविण्यात आले आहेत. त्यातील महाविद्यालयांचे प्रवेश थांबविण्यात आले. तर अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमता कमी करण्यात आली. विद्यापीठातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२५ पेक्षा अधिक पदवी अभ्यासक्रम आहेत. प्रवेश क्षमता पायाभूत सुविधा, पूर्णवेळ प्राचार्य, पात्र शिक्षक यांची संख्या याचा विचार करून निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. महाविद्यालयांची यादी विद्यार्थ्याना वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली. विद्यापीठाने शैक्षणिक मूल्यांकनानंतर अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता निश्चिती केली आहे.
पहिल्या टप्प्यात २७१ तर दुसऱ्या टप्प्यात १०२ महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यात आले. पायाभूत सुविधा, पात्र शिक्षक, नॅक मूल्यांकन याचा विचार करत अनेक महाविद्यालयांच्या प्रवेशात प्रवेशक्षमता ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली. महाविद्यालय प्रशासनाला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर पदवी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात येते.
विद्यार्थी, पालकांनी मान्यता पाहुनच प्रवेश घ्यावा, अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता, महाविद्यालयात उपलब्ध पायाभूत सुविधा तपासाव्यात यानंतरच प्रवेश घ्यावेत असे स्पष्ट केले आहे.
महाविद्यालयांना अशा आहेत सुचना
महाविद्यालयांमध्ये उपलब्ध पायाभूत सुविधा, नॅक मूल्यांकन, शैक्षणिक अंकेक्षण, अध्यापक नियुक्त्या व इतर तत्सम बाबींच्या अधारे २०२३-२४साठी तात्पुरती संलग्नता यादी तयार करण्यात आली असून विद्यापीठाच्या
www.bamu.ac.in वेबसाइटवर प्रकाशीत करण्यात आली. यादीचे अवलोकन करावे तसेच संबंधित महाविद्यालयांना या यादीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास ५ जूनपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह लेखीस्वरुपात त्रुटी आक्षेप अर्ज महाविद्यालयाचा क्रमांक, कोडसह शैक्षणिक विभागात सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले.
८० टक्के महाविद्यालयांवर परिणाम
शैक्षणिक वर्षात २०२३ -२४ यासाठीची संलग्नित ४७१ महाविद्यालयांची यादी घोषित करण्यात आली. ३७२ महाविद्यालयांमधील बीए, बीकॉम, बीएस्सी असे एकत्रित ३९३ अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्णतः थांबविण्यात आले. विविध महाविद्यालयातील ५३४ अभ्यासक्रमांचे प्रवेश घटविण्यात आले, तर विविध महाविद्यालयात ९७३ अभ्यासक्रमांना पूर्ण क्षमतेने प्रवेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ. श्याम सिरसाठ यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त अभ्यासक्रम व प्रवेशक्षमता याची यादी प्रसिध्द करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल.
डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.