शिवरूपी वटवृक्षाची पूजा
वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे हा यामागचा हेतू असावा.
पूजनासाठी आवश्यक साहित्य
चौरंग,पाट,लाल कापड, सूतगंडी, वडाच्या झाडांची कुंडी, खारीक२,बदाम२, सुपारी१०, खोबरे वाटी २,खडीसाखर, गुळाचा खडा, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू, धूप तूपाचे निरंजन, माचिस, विड्याची पाने २५, आंबे, आसन, नित्य सेवा ग्रंथ, पानवड्यांचा नैवेद्य, यथा शक्ति दक्षिणा, पंचामृत, ताम्हण, पळी-पेला (तांब्याचे फूलपात्र), कलश, कापूर, फूले-दुर्वा, तूळशीपत्र, देवघरातील गणपती, शंख, घंटी, जानवे४, जोड, सूटी नाणी इ.
वटपौर्णिमा पूजा विधी
प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे. हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे. वडाच्या मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी.
किती सुवासिनींची ओटी भरावी
वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच किंवा सात प्रदक्षिणा घालाव्या. ५ सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.