मुंबईचा दहावीचा निकाल घटलेला असला तरी यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. यंदा मुंबई विभागातील ११ हजार ७८५ विद्यार्थ्यांनी दहावीत ९० टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे. गेल्या वर्षी मुंबई विभागातील १० हजार ७६४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले होते. त्याचवेळी राज्यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांचे प्रमाण यंदा मात्र घटले आहे. राज्यातील ६६ हजार ५७८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत यश संपादन केले आहे. त्याचवेळी गेल्यावर्षी राज्यातील ८३ हजार ६० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले होते.
यंदा मुंबईचा निकाल ३.२८ टक्क्यांनी घटला आहे. मात्र त्याचवेळी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्य मंडळाबरोबरच सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या निकालातही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुंबईतील नामांकित कॉलेजांमधील प्रवेशाच्या जागा मिळविण्यासाठी यंदा चूरस पाहायला मिळणार आहे.
मुंबईपाठोपाठ पुण्यातील ११ हजार ४४१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण संपादन केले आहेत. त्याखालोखाल औरंगाबाद विभागातील ९ हजार ७४८ विद्यार्थी, कोल्हापूरमधील ८ हजार ५५९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. तर कोकण विभागातील सर्वात कमी १ हजार ४७१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
दरम्यान, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढलेली असली तरी त्या तुलनेत ७५ टक्क्यांहून गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटलेले आहे. यंदा मुंबई विभागातील ९२ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी ७५ ते १०० टक्क्यांमध्ये गुण मिळविले आहेत. गेल्यावर्षी एक लाख सहा हजार विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले होते.
यंदा मुंबईतील ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असल्याने नामांकित कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. तसेच ६० ते ७५ टक्क्यांमधील विद्यार्थी संख्याही यंदा मोठी आहे. जवळपास १ लाख १२ हजार विद्यार्थ्यांनी या श्रेणीत गुण मिळविलेले असल्याने त्यांच्यात कॉलेजांमधील जागा मिळविण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी
विभाग विद्यार्थी संख्या
मुंबई ११,७८५
पुणे ११,४४१
नागपूर २,७६३
औरंगाबाद ९,७४८
कोल्हापूर ८,५५९
अमरावती ६,१६७
नाशिक ७,४१६
लातूर ७,२२८
कोकण १,४७१
मुंबई विभागातील गुणवंत विद्यार्थी
एकूण विद्यार्थी ३,३५,१२०
७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी ९२,५०५
६० ते ७५ टक्क्यांमधील विद्यार्थी १,१२,००१
४५ ते ६० टक्क्यांमधील विद्यार्थी ८३,०७०
३५ ते ४५ टक्क्यांमधील विद्यार्थी- २६,३००