स्वातंत्रदिनी औरंगाबादेत गोंधळ; एमआयएम कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

हायलाइट्स:

  • क्रीडा विद्यापीठासाठी एमआयएमने पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
  • एमआयएम कार्यकर्त्यांने केला पालकमंत्र्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न
  • ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात एमआयएमचा गोंधळ

औरंगाबाद: मराठवाड्यासाठी औरंगाबादला घोषित करण्यात आले क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेल्याप्रकरणी एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून आमचे विद्यापीठ परत करा अशी मागणी केली. खासदार इम्तियाज जलील यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात आमचे विद्यापीठ परत करा अशी मागणी असलेले टी-शर्ट घालून शासकीय कार्यक्रमात सहभाग नोंदविला. ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर विवेक विभागीय आयुक्त कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या पालकमंत्र्यांच्या गाडीच्या ताफा समोर एमआयएम कार्यकर्त्यांनी उडी घेत ताफा रोखण्याचा प्रयत्न केला.

एमआयएम पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर करण्यात आलेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष शारेख नक्शबंदी, एमआयएम पक्षाचे गटनेते नासेर सिद्दिकी गंगाधर ढगे, कुणाल खरात, अजीम अहमद शेख फिरोज आरेफ हुसेनी, हाजी इसाक, शेख रफीक, शेख साबेर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. आमचे विद्यापीठ परत करा, मुख्यमंत्री हाय हाय, पालकमंत्री हाय हाय, विद्यापीठ आमच्या हक्काचं, अजित पवार हाय हाय अशा घोषणा एमआयएम कार्यकर्त्यांनी दिल्या. हातात काळे झेंडे आणि मागणीचे छोटे बोर्ड घेऊन या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

या आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर खासदार इम्तियाज जलील हेसुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते. एका बाजूला आंदोलन सुरू असताना, पालकमंत्री सुभाष देसाई यांचा ताफा विभागीय आयुक्तलय येथून बाहेर पडत असताना, एम आय एम चा एक कार्यकर्ता शेख नदीम याने पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील एका गाडी समोर उडी घेऊन ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. काही वेळेतच पोलिसांनी धाव घेऊन या युवकाला गाडी समोरून बाजूला केले. हा ताफा हॉटेल कडे रवाना झाला. या घटनेत एम आय एम कार्यकर्ता शेख नदीम हा जखमी झाल्याची माहिती एम आय एमच्या पदाधिकारी दिली.

खासदारांनीही केले अभिनव आंदोलन

क्रीडा विद्यापीठाच्या संदर्भात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी अभिनव आंदोलन करत सत्ताधाऱ्याचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांनी पांढ-या कलर च्या टी-शर्टवर आमच्या हक्काचे क्रीडा विद्यापीठ परत करा अशी मागणी लिहिलेले टी-शर्ट घातले होते.

विधानसभेत आवाज उचलणार- संजय शिरसाट

दरम्यान, ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर औरंगाबाद पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय शिरसाट व महापौर नंदकुमार घोडेले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या भेटीत क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला ठेवावी ही मागणी आपण विधानसभेत उचलणार असल्याचे आश्वासन दिले. क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेण्याची घोषणा अर्थसंकल्पीय बैठकीत घेण्यात आली आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला नाही. यामुळे क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला ठेवावे या मागणीसाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहितीही आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

क्रीडा विद्यापीठाबाबत आंदोलन चालू ठेवणार

स्वातंत्र्यदिनाच्या शुभ दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणे. असे आंदोलन आम्हाला करावी लागत आहे. ही बाब वेदनादायी आहे. मात्र औरंगाबादच्या हक्काचं क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मराठवाड्यासाठी अन्यायकारक आहे. यामुळे क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेण्याचा निर्णय परत घेण्यात आला नाही तर आगामी काळात आणखीन तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्धार खासदार इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवला.

अण्णाभाऊ साठे चौकात काळे झेंडे

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएम पक्षाचे पदाधिकारी आंदोलन करीत असताना काही कार्यकर्ते हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकात काळे झेंडे दाखविण्यासाठी थांबले होते. या कार्यकर्त्यांनी कोणत्या प्रकारचा कायदा हातात घेऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Source link

mim blames ncpmim leader imtiaz jaleelsports university in aurangabadइम्तियाज जलीलऔरंगाबाद क्रिडा विद्यापीठ
Comments (0)
Add Comment