अकरावीच्या केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (कॅप) शिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया ८ जूनपासून सुरू होणार असून, २२ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. नागपूरसह अमरावती, नाशिक, पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई या महापालिका क्षेत्रांमध्ये ‘कॅप’च्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राज्यभरातील पाच महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ‘अर्ज भाग १’ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. २ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण संचालनालयामार्फत लगेचच ‘अर्ज भाग २’ भरण्याची आणि ‘कॅप’ची प्रक्रिया जाहीर करण्यात आली. त्यानुसार पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ८ ते १२ जूनदरम्यान अर्जाचा ‘भाग २’ भरता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीक्रमानुसार कमीत कमी एक व जास्तीत जास्त दहा महाविद्यालयांची नावे भरता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरलेला नसे, त्यांना या काळात अर्जाचा भाग एकही भरता येणार आहे.
– १३ जूनला पहिल्या फेरीसाठी तात्पुरती यादी जाहीर केली जाणार
– १५ जूनपर्यंत काही तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांना त्या दाखल करता येणार
– १५ जूनलाच अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल
– १९ जूनला पहिल्या कॅप यादीतील विद्यार्थी व त्यांना मिळालेल्या ज्युनिअर कॉलेजची यादी जाहीर होईल
– २२ जूनपर्यंत या यादीतील विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये आपले प्रवेश निश्चित करावे लागतील
– २३ जूनला पहिल्या फेरीतील प्रवेशानंतर उर्वरित जागांची यादी जाहीर केली जाईल
– कोटा प्रवेशाची प्रक्रियाही या कालावधीतच राबविली जाईल, त्याचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात आले