शाळांनी विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणासाठी आता शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. आधार प्रमाणीकरण शंभर टक्के पूर्ण करा अन् नंतर बारावीच्या गुणपत्रिका घ्या असे शिक्षण मंडळाला शिक्षणाधिकारी कार्यालयाने कळविल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात आधार प्रमाणीकरण ९० टक्क्यांच्या आसपास आहे. तरी, अद्याप अनेक संस्थांनी प्रक्रिया न केल्याने अशाप्रकारची कार्यवाही करण्याचा विचार समोर आल्याची चर्चा आहे. यावर मंडळ काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
विभागात छत्रपती संभाजीनगरसह पाच जिल्हे येतात. अनेक प्रक्रियेत मागे आहेत. आधार अपडेट न झाल्याने अनेक विद्यार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यासह संचमान्यता या संख्येशी जोडण्यात आली. प्रमाणीकरणाबाबत शिक्षण विभागाने संस्थांवर कारवाईचे संकेत दिले. त्यानुसार बारावी गुणपत्रिका देताना आधारप्रमाणीकरणाचा मुद्दा समोर केला जाण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना पाच जूनपासून गुणपत्रिकांचे वाटप होणार आहे.
पगारपत्रकासोबत अहवाल
शिक्षण विभाग गुणपत्रिकांसह विद्यार्थी आधार प्रमाणीकरणचा अहवाल पगार पत्रकासोबत जोडण्याची सक्ती करण्याची शक्यता आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्यादृष्टीकोनातून तयारी केली. मुख्याध्यापक, प्राचार्यांना याबाबत पत्राद्वारे विभागाने कळविले. जिल्ह्यात अद्यापही ४८ हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध आहेत. ४१ हजार विद्यार्थी यांचे आधार प्रक्रिया झालेली नाही. विद्यार्थी पटावर आहेत, त्याचा आधार क्रमांक आहे, परंतु त्याची पडताळणीच केलेली नसल्याचे सांगण्यात आले. अकरा महिन्यातही प्रक्रिया झाली नाही. हे विद्यार्थी बोगस ठरवले जाण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणी मुख्याध्यापकाचे वेतन बंद करणे, अशा शाळांचे कोणतेही प्रस्ताव न स्वीकारणे, निकाल वितरीत न करणे आदी कारवाई केली जाण्याचे संकेत शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.