कुरु वंशाचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा
मृत्युपूर्वी शकुनीचे वडील सुबालने धृतराष्ट्राला विनंती केली की माझ्या सर्वांत लहान पुत्राला सोडून द्या, जी विनंती धृतराष्ट्राने मान्य केली. राजा सुबाल याचा सर्वांत छोटा पुत्र म्हणजे दुसरा तिसरा कोणी नव्हे, तर शकुनी होता. जेव्हा भीष्माने गांधार देशावर आक्रमण केले होते, तेव्हाच त्याचा आणि त्याच्या कुरु वंशाचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा शकुनीने कली होती. त्यामुळे त्याची प्रतिज्ञा पूर्ण होईपर्यंत तो हस्तिनापुर सोडायला तयार नव्हता. भीष्माने गांधार देशाचे युद्धामध्ये मोठे नुकसान करून गांधारीचा विवाह दृष्टिहीन असलेल्या धृतराष्ट्रासोबत लावल्याचा राग शकुनीच्या मनामध्ये कायम होता. त्याचा बदला म्हणून शकुनीने भीष्माचा आणि त्याच्या संपूर्ण वंशाचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा केली.
यामुळे शकुनीने गांधार देशाचा त्याग केला
महाराणी गांधारी ही विष्णूभक्त असली, तरी तिचा सख्खा भाऊ असलेला शकुनी मात्र कट्टर शिवभक्त होता. त्याला उलुका आणि विक्रासुर नावाचे दोन मुले होते. उलुकाने शकुनीला हस्तिनापुर सोडून गांधार देशाला परतण्याची अनेकदा विनंती केली, पण शकुनी मात्र हट्टाने हस्तिनापुरातच मुक्काम करून राहिला. जेव्हा कौरवांचा वरिष्ठ युवराज दुर्योधनाने पहिले की केवळ शकुनी जिवंत बचावला आहे, तेव्हा त्याने पित्याच्या आज्ञेने त्याला क्षमा करून आपल्या देशाला परत जाण्यास सांगितले किंवा हस्तिनापुरातच राहून आपले राज्य पाहण्यास सांगितले. शकुनीने हस्तिनापुरात राहण्याचा निर्णय घेतला. शकुनीने अल्पावधीतच हस्तिनापुरात सर्वांचा विश्वास संपादन केला आणि १०० कौरवांचा सल्लागार बनून राहिला.
यामुळे शकुनी एका पायाने अपंग होते
शकुनीने आपल्या डोळ्यांसमोर आपला परिवार झिजून झिजून मरताना पाहिला आणि शेवटी स्वतः जिवंत राहिला. या घटनेची आठवण शकुनीला व्हावी म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचा पाय मुरडून त्याला शारीरिकदृष्ट्या विकलांग बनवले. त्याच्या पायातील वेदना त्याला प्रत्येक वेळी संपूर्ण कुरु कुळाचा बदला घेण्याची आठवण करून देईल असे त्यांचे मत होते. त्यामुळेच शकुनीला अपंग बनवण्यात आले.
शकुनीच्या फासांचे रहस्य
शकुनीजवळ जे द्यूत खेळण्याचे फासे होते ते त्याच्या मृत वडिलांच्या मणक्याच्या हाडांचे बनलेले होते. आपल्या वडिलांच्या मृत्यू नंतर शकुनीने त्यांची काही हाडे स्वतःजवळ ठेवली होती. शकुनी द्यूत खेळण्यात अतिशय पारंगत होता. शकुनी एका पायाने अधू जरूर होता, पण द्यूतक्रीडेत अत्यंत प्रवीण होता. त्याचे फाशांवर स्वामित्व असे होते की त्याला हवे तेच आकडे फाशांवर येत असत. एक प्रकारे त्याने फाशांवर अशी सिद्धी मिळवली होती की त्याच्या बोटे फिरवण्यावर आकडे निश्चित होत असत.
शकुनीचा वध
कुरुक्षेत्र युद्धात शकुनीने दुर्योधनाला साथ दिली. शकुनी पांडवांचा कौरवांइतकाच तिरस्कार करत असे, कारण त्याला दोन्हीकडून त्रास झाला होता. शकुनीने पांडवांना अनेक संकटे दिली. भीमाने अनेक प्रसंगी शकुनीला त्रास दिला. महाभारत युद्धात सहदेवाने शकुनीचा त्याच्या पुत्रासहित वध केला.