हायलाइट्स:
- राज ठाकरेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका
- मंत्री जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर
- राज ठाकरेंचे विधान लोकांचे लक्ष वेधण्यासाठी
म. टा. प्रतिनिधी, सांगली:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच राज्यात जातीयवादी राजकारण वाढल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी प्रत्युत्तर दिले असून, काही लोक काहीतरी बोलून केवळ लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करीत असतात. त्याकडे राज्यातील लोक दुर्लक्ष करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. सांगली येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, काही लोक काहीतरी विधान करून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करत असतात. त्याकडे राज्यातील लोक दुर्लक्ष करतील. पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत ते म्हणाले, महापुरामुळे सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने गरीब कुटुंबीयांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी जशी गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले आहे, तसेच श्रीमंत कुटुंबीयांनी धान्य घेऊ नये. त्याचा लाभ एखाद्या गरीब कुटुंबाला होईल. ज्यांची शेती आहे, घरात एसी आहे, गाड्या आहेत त्यांनी धान्याचा लाभ घेऊ नये.
नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणाबद्दल पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात यापुढे कोणताही तालुका दुष्काळी राहणार नाही. म्हैसाळ योजनेचे विस्तारीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाढीव योजनेचे डिझाइन अंतिम टप्प्यात आले आहे. डिझाइन पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या कामाला गती मिळेल. सांगली जिल्ह्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लोक बाधित होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ऑक्सिजन बाहेरच्या राज्यातून मागवावा लागला होता. यावेळी तिसऱ्या लाटेत जर ऑक्सिजनची कमतरता भासली तर पुन्हा पूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जनतेने नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
… तर नाईलाजाने लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा