राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क’मध्ये (एनआयआरएफ) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने पहिल्या ५०मधील स्थान गमावले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठ ४५व्या स्थानी होते. यंदा मुंबई विद्यापीठाची ५६व्या स्थानावर घसरण झाली आहे. देशातील १०० सर्वोत्कृष्ट संस्थांच्या यादीतही मुंबई विद्यापीठाची ९६व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट १०० उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठ ८१व्या स्थानी होते.
देशातील उच्च शिक्षण संस्थांतील स्पर्धात्मकता वाढावी यासाठी दरवर्षी नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क जाहीर केले जाते. यामध्ये सर्व शैक्षणिक संस्थांचे एकत्रित रँकिंग, विद्यापीठ, कॉलेज, रिसर्च संस्था, फार्मसी, इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, मेडिकल, डेंटल, विधी आणि आर्किटेक्चर आदी प्रकारांमध्ये हे रँकिंग जाहीर केले जाते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी २०२३ या वर्षाचे रँकिंग जाहीर केले. त्यामधून मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक संस्थांच्या यादीत घसरण झाल्याचे समोर आले आहे. मुंबई विद्यापीठ २०२०मध्ये ९५, तर २०२१मध्ये ९६व्या स्थानी होते. त्यात काहीशी सुधारणा होऊन गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठ शिक्षण संस्थांच्या यादीत ८१व्या स्थानी पोहोचले होते. यंदा त्यात पुन्हा घसरण झाली आहे.
आयआयटी मुंबईची एका स्थानाने घसरण झाली असून यंदा चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. गेल्या वर्षी आयआयटी मुंबई देशात तिसऱ्या स्थानी होते. मुंबई विद्यापीठाबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीही घसरण झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची देशातील सर्वोत्कृष्ट १०० शैक्षणिक संस्थांच्या यादीत २५व्या स्थानावरून ३५व्या स्थानी घसरण झाली आहे. यंदा देशातील सर्वोत्कृष्ट १०० महाविद्यालयांच्या यादीत सेंट झेवियर्स महाविद्यालयाला स्थान मिळू शकलेले नाही. तर, मुंबईतील निर्मला निकेतन महाविद्यालयाच्या रँकिंगमध्ये यंदा सुधारणा झाली आहे. महाविद्यालयाने ६९व्या स्थानावरून ५७व्या स्थानी मुसंडी मारली आहे. राज्यातील महाविद्यालयांच्या यादीत नागपूर येथील गव्हर्नमेंट इन्स्टिट्युट ऑफ सायन्स या संस्थेने देशात ८३वे स्थान पटकावले आहे.