दहावी निकालानंतर विद्यार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेश वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे. प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कट ऑफ वाढेल का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले. निकालात प्रावीण्य श्रेणी, प्रथम श्रेणीतील टक्का कमी झाला असेल तरी, आयटीआयच्या अनेक ट्रेड प्रवेशासाठी चुरस कायम असेल, काही ट्रेडला चुरस वाढेल, असा शिक्षकांचा कयास आहे. मराठवाड्यात ५४ ट्रेडसाठी २२ हजार १२० जागा उपलब्ध आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल २ जून रोजी जाहीर झाला. पॉलिटेक्निक, अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक, नोंदणीची प्रक्रिया याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयटीआयमधील अनेक ट्रेडच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमाला प्रचंड मागणी असते. त्याचा कट ऑफ यंदा आनखी वाढेल, असे सांगण्यात येते. इलेक्ट्रिशियन सह वायरमन, फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, रेफ्रिजरेशन, सर्वेअर टूल ऍण्ड डाय मेकिंग, टर्नर, वेल्डर अशा अभ्यासक्रमांनाही प्रवेशासाठी मोठी चुरस असते. प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया होईल व नंतर व्यवसायाचे (ट्रेड) पर्यायची प्रक्रिया असेल असे सांगण्यात येते. नवीन अभ्यासक्रमांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरु असल्याने यंदा प्रवेश क्षमता वाढेल असे सांगण्यात येते.
आयटीआयचा कट ऑफ वाढेल
दहावी निकालात प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येत घसरण झाली. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत कट ऑफ कसा राहील याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये चिंता आहे. प्रावीण्य, प्रथम श्रेणीतील टक्केवारी कमी असले तरी कट ऑफ वाढलेला असेल, असे आयटीआयमधील प्राचार्यांना वाटते. आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक मागील वर्षीचेही विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज भरतात. त्यामुळे मागील वर्षाचे ज्यांचे अकरावी, बारावी झालेले आहे, असे जास्तीत जास्त विद्यार्थी संस्थेमध्ये दहावीच्या गुणावर प्रवेश घेत असतात. त्यामुळे प्रवेशाची चुरस कायम असेल असे शिक्षकांनी सांगितले.
मराठवाड्यातील आकडेवारी..
शासकीय संस्था….. ८२
शासकीय संस्थांची क्षमता.. १५२००
खासगी संस्था……….. ६२
खासगी संस्थांची क्षमता…… ६९२०
मराठवाड्यातील ट्रेड ५४
मराठवाड्यात संस्था… १४४
एकूण प्रवेशक्षमता… २२१२०
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी .. २ लाख ६२ हजार पेक्षा अधिक
प्रवेशाबाबत विद्यार्थी, पालकांकडून चौकशी होते आहे. एक-दोन दिवसात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. आयटीआयमधील अभ्यासक्रमाला रोजगार आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होताना दिसून येत आहेत. अनेक व्यवसाय केलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. यंदा प्रवेशासाठी मेरीट वाढेल, कारण निकालाची टक्केवारी चांगली आहे. मागील वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थीही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात.
देविदास राठोड, प्राचार्य, बदनापूर आयटीआय.