कुलकर्णी यांनी १९९३मध्ये नागपूर येथील एलआयटी संस्थेतून सुवर्ण पदक पटकावत एम. टेक. पदवी प्राप्त केली. त्यानंतर कुलकर्णी यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेतून १९९४पासून प्राध्यापक म्हणून सुरुवात केली. याच संस्थेत संचालक म्हणून जून २०१५ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत त्यांनी कार्यभार संभाळला. कुलकर्णी यांनी मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेतील ऑइल, ऑलिओकेमिकल्स अँड सरफॅक्टंट्स या विभागाचे विभागप्रमुख म्हणून नोव्हेंबर २०२६पासून काम पाहिले आहे.
कुलकर्णी यांनी केमिकल टेक्नॉलॉजी विषयात पीएचडी केली आहे. त्यांच्या नावावर सात पेटंट आहेत. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नलमध्ये त्यांचे विविध संशोधन प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत.
राज्यातील ‘एनईपी’च्या अंमलबजावणीत महत्त्वाचे योगदान
डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी राज्याचे शैक्षणिक धोरण ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या राज्याच्या अभ्यासक्रम आराखडा समितीचे अध्यक्षपद कुलकर्णी यांनी भुषविलेले आहे.
नव्या कुलगुरूंसमोरील आव्हाने
– परीक्षांची आणि निकालाची विस्कटलेली घडी बसवणे
– ‘एनईपी’बाबत अधिक सुस्पष्टता आणणे
– विद्यापीठाचा घसरलेला दर्जा सुधारणे
– विद्यापीठात रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लावणे
– कॉलेजांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे.
– विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी सक्षम यंत्रणा उभारणे
– विद्यापीठाचे प्रलंबित धोरणात्मक निर्णय घेणे
– मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रांना अधिक सक्षम करणे
– विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा सुधारणे