FYJC Admission: अकरावी अर्जाचा भाग दोन उद्यापासून

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता अकरावीत प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेला प्रतिसाद वाढत आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ११ हजार २७८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांना पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गुरुवार (दि. ८)पासून अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे.

सध्या पहिल्या फेरीचे वेळपत्रक जाहीर झाले असून, त्यानुसार १९ जूनला निवडयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करून अर्जाचा एक भाग भरून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानुसार ११ हजार २७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून, यापैकी सात हजार ५८० विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केलेले आहेत. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरण्याची मुदत १२ जूनपर्यंत असून, अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

अर्जाच्या भाग दोनमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि शाखा यांच्या पसंतीक्रमानुसार पर्याय नोंदविता येणार आहेत. किमान एक, तर कमाल दहा पर्यायांची नोंद विद्यार्थ्यांना करता येणार आहे. गेल्या २-३ दिवसांममध्ये नोंदणीला जोरदार प्रतिसाद मिळत असून, पहिल्या फेरीत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या २० हजारांपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाकडून प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे.

त्यानुसार १९ जूनला पहिली निवडयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यासाठी २२ जूनपर्यंत मुदत दिली जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीत तीन नियमित प्रवेश फेऱ्या आणि एका विशेष फेरीच्या माध्यमातून अकरावीला प्रवेश दिले जाणार आहेत. उपलब्ध विद्यार्थी क्षमतेचा तपशील येत्या दोन दिवसांत उपलब्ध केला जाणार आहे.

-११ हजार २७८ विद्यार्थ्यांची नोंदणी

– ७ हजार ५८० विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक

– अर्जसंख्या २० हजारांपर्यंत जाण्याची शक्यता

– भाग एकसाठी १२ जूनपर्यंत मुदत

– भाग दोनसाठी १५ जूनपर्यंत मुदत

– १९ जूला पहिली निवडयादी प्रसिद्ध

– २२ जूनपर्यंत प्रवेशाची मुदत

Source link

Career Newseducation newsFYJC AdmissionFYJC Online admissionFYJC Part 2Maharashtra Timesअकरावी अर्जअकरावी प्रवेश
Comments (0)
Add Comment