महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हाती नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या नवी कोरी पुस्तके पडणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाने ‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत ‘बालभारती’कडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ९९ हजार ३९१ पुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार शाळास्तरावर पुस्तकांचे वाटप सुरू झाले आहे. अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
यंदा १३ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय साहित्य खरेदी करण्याची लगबग महापालिका शिक्षण विभागाने सुरू केली आहे. ‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत दर वर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्यासाठी महापालिका शिक्षण विभागाने २०२२३-२४ या या चालू शैक्षणिक वर्षासाठी ‘बालभारती’कडे पुस्तकांची मागणी नोंदवली आहे.
शिक्षण विभागाच्या मागणीनुसार, ‘बालभारती’कडून महापालिकेच्या पिंपरी आणि आकुर्डी केंद्रावर पुस्तके दिली जातील. पुस्तक वितरणाची सुरुवात सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांचे हस्ते करण्यात आली. येत्या नऊ जूनपर्यंत शाळांना पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे. पुस्तकांचे वितरण २० केंद्रांवरून करण्यात येतील. विद्यार्थ्यांचे स्वागत नवी कोरी पुस्तके देऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांनाही शाळेची गोडी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील पुस्तकांची मागणी
इयत्ता मराठी माध्यम हिंदी माध्यम इंग्रजी माध्यम उर्दू माध्यम
पहिली ९,४२२ २५१ ५८८ ४५२
दुसरी ९,४२२ २५१ ५८८ ४५२
तिसरी ९,४२२ २५० ५९५ ४५२
चौथी ९,५४२ ३५५ ५९५ ४५८
पाचवी ११,३०६ ४३१ १०९४ ५२३
सहावी ११,५६४ ५१२ १००२ ५८२
सातवी १२,४०० ४३४ ११४० ६३२
आठवी १२,६६४ ४५६ ९७५ ५८१
एकूण ८५,७४२ २,९४० ६,५७७ ४,१३२