विद्यापीठाने ३१ मे रोजी महाविद्यालयांची अभ्यासक्रमनिहाय यादी जाहीर केली. ३७१ महाविद्यालयातील बीए, बीकॉम, बीएससीसह १२५ अधिक अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता जाहीर केली. २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी ही महाविद्यालये प्रवेश पात्र असतील, प्रवेशक्षमता यासह कोणती महाविद्यालये प्रवेशास पात्र नाहीत, प्रवेशक्षमता किती कमी केली याबाबतही स्पष्ट करण्यात आले.
यादीनंतर महाविद्यालयांना आक्षेप नोंदविण्यासाठी पाच जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. अद्याप आलेल्या आक्षेपांची संख्या २२५ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाने ४७१ महाविद्यालयांची यादी जाहीर केली. त्यात अनेक महाविद्यालयांचे प्रवेश थांबविण्यात आले. यादीनुसार ८० टक्के महाविद्यालये प्रभावित झाले आहेत. यादीनुसार ३७२ महाविद्यालयांमधील बीए, बीकॉम, बीएस्सी असे एकत्रित ३९३ अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्णतः थांबविण्यात आले.
विविध महाविद्यालयातील ५३४ अभ्यासक्रमांचे प्रवेश घटविण्यात आले तर विविध महाविद्यालयात ९७३ अभ्यासक्रमांना पूर्ण क्षमतेने प्रवेश देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर याबाबत आलेल्या आक्षेपांची संख्या मोठी असल्याचे समोर आले.
कुलगुरूंसमोर होणार सुनावणी
पायाभूत सुविधांसह इतर बाबींचा विचार करत प्रशासनाने अनेक महाविद्यालयांवर कारवाई केली. यादीचे अवलोकन करत संबंधित महाविद्यालयांना यादीमध्ये त्रुटी आढळल्यास पाच जूनपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह लेखीस्वरुपात त्रुटी आक्षेप अर्ज महाविद्यालयाचा क्रमांक, कोडसह शैक्षणिक विभागात सादर केले. सुमारे सव्वादोनशे आक्षेप आल्याचे सांगण्यात येते. हे आक्षेप कुलगुरू डॉ. येवले यांच्यासमोर ठेवण्यात येतील. त्यावर कुलगुरू निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते.