सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मानांकन घसरले

म. टा. प्रतिनिधी, पुणेराष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’मध्ये (एनआयआरएफ) सलग पाचव्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक घसरण सुरूच राहिली आहे. देशातील शैक्षणिक संस्थांच्या सर्वसाधारण गटात (ओव्हरऑल) विद्यापीठाचे मानांकन ३५व्या क्रमांकापर्यंत घसरले असून, विद्यापीठ गटात २०२०पर्यंत पहिल्या १० क्रमांकात स्थान मिळविणाऱ्या विद्यापीठाला यंदा १९व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. दोन्ही क्रमवारीत विद्यापीठाची घसरण झाली असली, तरी राज्यातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अव्वल क्रमांक कायम राखल्याचे या रँकिंगमधून स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी देशातील कॉलेज आणि विद्यापीठांचे एनआयआरएफ रॅंकिंग जाहीर केले. देशातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मंत्रालयाकडून हे रॅंकिंग दिले जाते. क्रमवारी जाहीर करताना संशोधन, पेटेंट, सर्वसमावेशकता, निकाल, प्लेसमेंट, विद्यार्थ्यांच्या संख्येत प्राध्यापकांचे प्रमाण, विद्यार्थिनींची संख्या, शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा असे निकष निश्‍चित करण्यात आले. त्यावरून दर वर्षी सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची क्रमवारी प्रसिद्ध केली जाते.

यंदा या प्रक्रियेत आठ हजार ६८६ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. ऑक्‍सफर्ड ऑफ ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे देशपातळीवर मानांकन घसरणे, ही राज्याच्या शैक्षणिकदृष्ट्या चिंतेची बाब आहे. ‘एनआयआरएफ’मध्ये विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी ५८.३१ गुण मिळाले आहेत.

तर, सर्वसाधारण गटात ५५.७८ गुण आहेत. त्यामध्ये पेटंट गटात विद्यापीठाला १५ पैकी ० गुण, तर प्रोजेक्ट आणि प्रोफेशनल प्रॅक्टिस गटात १.७४ गुण मिळाले आहेत. पर्सेप्शनमध्ये विद्यापीठाला केवळ १५.८२ गुण मिळाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाला लोकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण करणे मोठे आव्हान आहे.

विद्यापीठाचे मानांकन घसरण्याचे कारणे

– वर्षभर पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू, प्र-कुलगुरू नसणे

– करोना काळात गुणवत्तेवर झालेला परिणाम

– परीक्षांचे नियोजन रखडणे

– प्राध्यापकांच्या रिक्त जागांमध्ये वाढ

– रिसर्च प्रोजेक्ट, पेटंट नसणे

– लोकांमध्ये विद्यापीठाची प्रतिमा ढासळणे

‘आयआयटी मद्रास’ पहिले

देशात विद्यापीठ गटात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगळुरूने (आयआयएस्सी) पहिला क्रमांक पटकाविला आहे, तर ओव्हरऑल रँकिगमध्ये आयआयटी मद्रासने पहिले स्थान मिळवले आहे. यामध्ये आयआयटी मुंबई चौथ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे दंत विभागात डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. कॉलेज गटात मुंबईच्या कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतने (५७), फर्ग्युसन कॉलेजने (७९) आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने (८३) वा क्रमांक पटकाविला आहे.

…..

वर्ष सर्वसाधारण गट विद्यापीठ गट

२०१९ १७ १०

२०२० १९ ०९

२०२१ २० ११

२०२२ २५ १२

२०२३ ३५ १९

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एनआयआरएफ रँकिंगमध्ये झालेली घसरण अत्यंत वेदनादायी आहे. विद्यापीठाने गेल्या एक वर्षात शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने नक्की काय प्रयत्न केले, असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने यातून बोध घ्यावा आणि विद्यापीठाचे मानांकन कसे उंचावेल, यासाठी शैक्षणिक प्रयत्न करायला हवेत.

– डॉ. नितीन करमळकर, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले विद्यापीठाची रँकिंग कमी झाल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात तसे नाही. यंदा रँकिंगमध्ये सहभागी झालेल्या संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, आठ हजारांवर गेली आहे. विद्यापीठात प्राध्यापकांचे रिक्त पदे आणि करोनामुळे थांबलेल्या संशोधनाचा परिणाम रँकिंगवर झाला आहे. पुढील काळात प्राध्यापक भरतीसह नवीन संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे निश्चितच क्रमवारी सुधारेल. पुणे विद्यापीठ आजही राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत क्रमांक एकवर आहे.
– डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Source link

education newsMaharashtra TimesRank droppedSavitribai Phule Pune UniversitysppuSPPU Rankपुणे विद्यापीठ मानांकनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Comments (0)
Add Comment