सांगलीत राष्ट्रवादी आणि भाजपा आमने-सामने; एकाच प्रकल्पाचे दोन वेळा भूमिपूजन

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली
  • दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलं प्रकल्पाचं भूमिपूजन
  • तणावामुळे पोलिसांना वाढवावा लागला बंदोबस्त

सांगली : सांगलीत नव्याने साकारण्यात येणाऱ्या चिल्ड्रन्स पार्कच्या भूमिपूजनावरून रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये (NCP Vs BJP) श्रेयवादाची लढाई रंगली. महापालिकेतील महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती व भाजपच्या स्थानिक नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांना डावलून महापौर आणि महापालिका प्रशासनाने भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तत्पूर्वीच भाजपच्या नगरसेवकांनी चिल्ड्रन्स पार्कचे भूमिपूजन केले. भाजपच्या कामांचे श्रेय राष्ट्रवादीने लाटू नये, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादी आणि भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईमुळे पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला.

विश्रामबाग परिसरातील वाडीकर मंगल कार्यालयाशेजारी चिल्ड्रन्स पार्क साकारले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते चिल्ड्रन्स पार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र भूमिपूजन कार्यक्रमासाठी याच परिसरातील नगरसेविका तसेच महिला व बालविकास विभागाच्या सभापती गीतांजली ढोपे पाटील यांना निमंत्रण मिळाले नाही.

जगभरातील मराठी उद्योजकांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; तरुणांसाठी केलं खास आवाहन

भाजपच्या नगरसेवकांना डावलून राष्ट्रवादीकडून चिल्ड्रन्स पार्कचे श्रेय लाटले जात असल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक भूमिपूजन कार्यक्रमस्थळी पोहोचले. महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती गीतांजली ढोपे पाटील यांनी अन्य नगरसेवकांसह चिल्ड्रन्स पार्कच्या भूमिपूजनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. काही वेळ पोलिसांशी हुज्जत झाल्यानंतर नगरसेवकांनी बाजूलाच भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला.

काय आहे भाजपचा आरोप?

‘दहा महिने पाठपुरावा करून चिल्ड्रन्स पार्कला मंजुरी मिळवली. माझ्याच प्रभागात होणाऱ्या चिल्ड्रन्स पार्कच्या भूमिपूजनाचे निमंत्रण देण्याचे टाळून याचे श्रेय राष्ट्रवादीकडून लाटले जात आहे. राष्ट्रवादीच्या महापौरांकडून भाजपच्या नगरसेवकांची अडवणूक होत असल्याने महापौरांनी पदाचा राजीनामा द्यावा’, अशी मागणी सभापती ढोपे पाटील यांनी केली.

यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने तणाव वाढला होता.

रेशन धान्याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी केलं महत्त्वपूर्ण आवाहन

पोलिसांनी वाढवला बंदोबस्त

भाजपच्या नगरसेवकांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकल्याने पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला. यानंतर काही वेळाने पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते चिल्ड्रन्स पार्कचे भूमिपूजन करण्यात आले. चिल्ड्रन्स पार्क कशा पद्धतीने साकारले जाईल याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुदिन बागवान, आदी उपस्थित होते. एकाच चिल्ड्रन्स पार्कच्या भूमिपूजनाचे दोन कार्यक्रम झाल्याने शहरात दोन्ही पक्षांच्या श्रेयवादाची चर्चा रंगली आहे.

Source link

bjp vs ncpJayant Patilsangali newsजयंत पाटीलभाजपराष्ट्रवादीसांगली न्यूज
Comments (0)
Add Comment