हायलाइट्स:
- ‘शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी संकुल असावे’
- ‘बाजारपेठेत जे विकेल तेच पिकविण्यावर आपला भर राहणार’
- कृषी संकुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
वाशिम : ‘राज्यातील शेतकरी आणि शेती हीच आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या संकल्पनेतून काम करण्यात येत आहे. वाशिम येथे उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे कृषी संकुल असावे,’ अशी इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री १५ ऑगस्ट रोजी वाशिम येथील स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या ई-भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
कृषिमंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांची मंचावर उपस्थिती होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र वाशिम जिल्ह्याचे वचन दिले होते. ते त्यांनी वाशिम जिल्ह्याची निर्मिती करून पूर्ण केले. त्याच वाशिम जिल्ह्यात आज राज्यातील पहिल्या अद्ययावत बहुउद्देशीय कृषि संकुलाचे भूमिपूजन होत आहे, हा मोठा योगायोग आहे. विकेल ते पिकेल या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बाजारपेठेत जे विकेल तेच पिकविण्यावर आपला भर राहणार आहे. एक जिल्हा, एक पीक या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
करोना काळातही न थांबता शेतकरी शेतामध्ये राबराब राबत असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मेहनतीवरच राज्याचा विकास होत आहे. शेतकरी पिकवतो म्हणूनच आपण दोन घास खाऊ शकतो. शेतकऱ्याच्या कष्टाचे सोने व्हावे, यासाठी महाविकास आघाडी सरकार एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यापासून ते आताचा ई-पीक पाहणी प्रकल्पासारखे अनेक निर्णय, उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने यापुढेही शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.